पश्चिम घाटातील जैवविविधता धोक्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 5, 2018 12:59 AM2018-07-05T00:59:19+5:302018-07-05T00:59:33+5:30
संदीप आडनाईक ।
लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : खाणकाम व प्रदूषणामुळे पश्चिम घाटातील शुद्ध पाण्याच्या स्रोतांवर आधारित परिसंस्था व अनेक प्रकारच्या सजीवांच्या प्रजाती धोक्यात आल्या आहेत. पश्चिम महाराष्ट्र हे जैवविविधतेने अतिसंपन्न क्षेत्र आहे. तेथे विकासकामांचे नियोजन करताना शुद्ध पाण्याच्या स्रोतांचा व वन्य प्रजातींच्या रक्षणाचा विचार होणे गरजेचे आहे.
राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी शिकार, राखीव वनक्षेत्रे आणि वन्यजिवांबाबत अनेक कायदे तसेच अधिसूचना केल्याचे इतिहासात डोकावताना आढळते. त्यांची प्रेरणा घेऊन जरी आपण आज काही नियम पाळले तरी जैवविविधता टिकण्यास मदत होईल. पश्चिम घाटातील वन्यजिवांचे संवर्धन व्हायचे असेल तर जंगलांचे, सड्यांचे संवर्धन होणे गरजेचे आहे. यामुळे या परिसरातून उगम पावणाऱ्या नद्या आणि पाण्याचे स्रोत यांचे संवर्धन होईल.
अनेक संरक्षित ठिकाणे ही शुद्ध पाण्याच्या स्रोतांजवळ असली तरी तेथील जैवविविधता धोक्यात आली आहे. कृषी व औद्योगिक प्रदूषणामुळे अनेक प्रजाती धोक्यात आल्या आहेत. निवासी व व्यावसायिक विकास, धरणे व ऊर्जानिर्मिती, खाणकाम यांमुळे शुद्ध पाण्याच्या स्रोतांमधील प्रजातींवर परिणाम झाला आहे.
पश्चिम घाटात पर्वतीय परिसरात ५० टक्के जंगले नष्ट झाली आहेत व नंतर तिथे अतिक्रमणे व जंगलतोड सुरूच राहिली. पश्चिम घाटात हजारो प्रकारचे प्राणी आढळतात. यांमध्ये जवळजवळ ३२५ प्रजाती जागतिक स्तरावर नष्ट व्हायला आलेल्या आहेत. तसेच उभयचरांमधील बºयाच प्रजाती या फक्त पश्चिम घाटातच आढळतात. ही रांग वन्य जिवांसाठी खूप उपयुक्त जागा आहे.
निलगिरीच्या जंगल क्षेत्रामध्ये आशियाई हत्ती मोठ्या प्रमाणावर आढळतात. ब्रह्मगिरी व पुष्पगिरी अभयारण्येसुद्धा हत्तींसाठी सुयोग्य निवासस्थाने आहेत. कर्नाटकातील पश्चिम घाटात ६,००० पेक्षा जास्त हत्ती आढळतात व भारतात सापडणाºया वाघांपैकी १0 टक्के वाघसुद्धा इथेच आहेत. अजगराच्या काही जाती या फक्त पश्चिम घाटातच आढळतात. तसेच अनेक विषारी व बिनविषारी प्रकारचे सरपटणारे प्राणीही येथेच आढळतात. या सर्वांचे संवर्धन व्हायचे असेल तर जैवविविधता वाचवण्यासाठी ठोस पावले उचलली गेली पाहिजेत.