पश्चिम घाटात जैवविविधता संशोधन केंद्र शक्य
By Admin | Published: January 15, 2016 11:45 PM2016-01-15T23:45:12+5:302016-01-16T00:46:57+5:30
प्रकाश जावडेकर : ‘काऊंट ग्रीन’ उपक्रम राबवा; शिवाजी विद्यापीठात देशातील पहिल्या लीड बोटॅनिकल गार्डनचे उद्घाटन
कोल्हापूर : पश्चिम घाटातील जैवविविधता कायम राहिली पाहिजे. त्यासाठी ‘विकास करू पण, पर्यावरणाचा नाश नाही’ हे ब्रीद घेऊन सरकार कार्यरत आहे. पश्चिम घाटातील जैवविविधतेचा सर्वांगीण विकास करण्यासाठी जैवविविधता संशोधन केंद्र सुरू करण्याचा विचार केला जाईल, असे प्रतिपादन केंद्रीय पर्यावरणमंत्री प्रकाश जावडेकर यांनी शुक्रवारी येथे केले.
शिवाजी विद्यापीठात साकारण्यात आलेल्या देशातील पहिल्या ‘लीड बोटॅनिकल गार्डन’ व नीलांबरी सभागृहाचे उद्घाटन मंत्री जावडेकर यांच्या हस्ते झाले. त्यानंतर विद्यापीठाच्या राजर्षी शाहू सभागृहात झालेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे तर, पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील, भारतीय वनस्पती सर्वेक्षण संस्थेचे संचालक डॉ. परमजित सिंग प्रमुख उपस्थित होते.
मंत्री जावडेकर म्हणाले, विविधतेतून नटलेला आपला देश आहे. यातील पश्चिम घाट हे एक वैशिष्ट्य आहे. या घाटातील जैवविविधतेचा सर्वांगीण विकास करण्यासाठी जैवविविधता संशोधन केंद्र सुरू करण्याचा विचार केला जाईल. नवकल्पना, संशोधनाला देशाच्या समृद्धी, विकासाचे साधन बनविण्याची गरज आहे. त्यासाठी विद्यापीठांनी पुढाकार घ्यावा, शिवाय देशाच्या विकासासाठी त्यांनी विद्यापीठ अनुदान आयोगाकडे अधिक लक्ष देण्याऐवजी नवसंशोधनावर भर द्यावा. विद्यापीठ व उद्योग यांच्यातील अंतर कमी व्हावे. विद्यापीठांनी त्यासाठी प्रयत्न करून विज्ञानाची पूजा, सामाजिक गरजा, संशोधनावर भर यादृष्टीने कार्यरत राहावे. वनस्पती संवर्धन लोकचळवळ बनविण्यासाठी विद्यार्थ्यांच्या सहभागातून ‘काऊंट ग्रीन’ उपक्रम विद्यापीठाने राबवावा. त्यात शहर, गावांतील वृक्षांची गणना व माहितीचे संकलन करून त्याची माहिती शालेय विद्यार्थ्यांना देण्यात यावी. देशातील वनस्पती व प्राणीशास्त्र उद्यानांशी शिक्षण संचालक, उपसंचालकांनी संपर्क साधून परिवर्तनाचे महत्त्वपूर्ण घटक असलेल्या शालेय, महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांना जैवसंपदा, विविधतेची माहिती द्यावी.
पालकमंत्री पाटील म्हणाले, विद्यापीठातील या गार्डनची प्रेरणा घेऊन विविध व्यक्ती, संस्थांनी झाडांचे संवर्धन करावे. कोल्हापूरच्या पर्यटनस्थळांच्या यादीत हे गार्डन यावे. शासन राज्यातील प्रत्येक शहराजवळ ‘स्वर्गीय उत्तमराव पाटील उद्यान’ विकसित करणार असून आगामी चार वर्षांत ९९ लाख वृक्ष लावणार आहे.
डॉ. सिंग म्हणाले, पर्यावरण संवर्धनाच्यादृष्टीने लीड बोटॅनिकल गार्डनची गरज आहे. हे गार्डन लोकांना दाखवून त्यांना जैवविविधतेच्या रक्षणासाठी प्रेरित करणे आवश्यक आहे. डॉ. शिंदे म्हणाले, पंचगंगा प्रदूषणमुक्तीसाठी काही प्रकल्प देण्यास विद्यापीठ तयार आहे. गार्डन व सभागृह उभारण्यात योगदान देणाऱ्या एस. व्ही. जोग, अभिजित भूतके, उपकुलसचिव डॉ. गिरीश कुलकर्णी यांचा सत्कार करण्यात आला. गार्डनची माहिती देणाऱ्या पुस्तिकेचे प्रकाशन झाले. कार्यक्रमास बीसीयुडी संचालक डॉ. डी. आर. मोरे, परीक्षा नियंत्रक महेश काकडे, प्राची जावडेकर, अनिता शिंदे, वित्त व लेखाधिकारी अजित चौगुले, आदी उपस्थित होते. यावेळी वनस्पतीशास्त्र विभागप्रमुख डॉ. एस. आर. यादव यांनी ‘बोटॅनिकल गार्डन’च्या वैशिष्ट्यांची दृक-श्राव्य माध्यमाद्वारे माहिती दिली. डॉ. बी. टी. दांगट, लुब्धा कागले यांनी सूत्रसंचालन केले. प्रभारी कुलसचिव डॉ. व्ही. एन. शिंदे यांनी आभार मानले. (प्रतिनिधी)
बोटॅनिकल गार्डनला पाठबळ राहील : जावडेकर
कार्यक्रमात डॉ. यादव यांनी बोटॅनिकल गार्डनला पर्यावरण मंत्रालयाने पाठबळ देऊन त्याच्यावर नियंत्रण ठेवावे. पश्चिम घाटातील जैवविविधतेचा अभ्यास करणारे केंद्र सुरू करावे, अशी सूचना केली. यावर मंत्री जावडेकर म्हणाले, विद्यार्थी, लोकांना मूलभूत विज्ञानाकडे वळविण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरणाऱ्या विद्यापीठातील या गार्डनला मंत्रालयाचे पाठबळ राहील. गार्डनवर मंत्रालयाऐवजी लोकांसह विद्यापीठाचे नियंत्रण रहावे.
गार्डन पाहण्यासाठी मान्यवरांची गर्दी...
उद्घाटनानंतर बोटॅनिकल गार्डन पाहण्यासाठी शिवाजी विद्यापीठात पाहुण्यांसह विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी हजेरी लावली. यामध्ये जिल्हाधिकारी डॉ. अमित सैनी, भारतीय वनस्पती सर्वेक्षण संस्थेच्या पुणे विभागाचे सहसंचालक लक्ष्मीनरसिंगम, मुख्य वनसंरक्षक एम. के. राव, आदींचा समावेश होता. दिवसभर विद्यार्थी, नागरिकांनी गार्डन पाहण्यास गर्दी केली होती.