शिधापत्रिकांवर बायोमेट्रिक पद्धतीने धान्य
By admin | Published: April 17, 2017 12:55 AM2017-04-17T00:55:01+5:302017-04-17T00:55:01+5:30
इचलकरंजीतील २४४ दुकानांतून नवीन पद्धतीचा लाभ : धान्याच्या काळाबाजाराला आळा बसण्यासाठी आधुनिक पद्धतीचा अवलंब
इचलकरंजी : शहरातील सरकारमान्य स्वस्त धान्य दुकानातून बायोमेट्रिक पद्धतीने शिधापत्रिकांवर धान्य मिळण्याची सोय उपलब्ध होणार आहे. त्यामध्ये सुमारे तीस हजार कुटुंबांना या नवीन पद्धतीचा लाभ मिळणार असून, शासनाच्या धोरणानुसार रेशनिंग दुकानातून होणाऱ्या धान्याच्या काळाबाजाराला आळा बसणार आहे. तसेच बायोमेट्रिक पद्धतीचा लाभ इचलकरंजी शहराबरोबरच ग्रामीण परिसरातील पाच गावांमध्ये असणाऱ्या २४४ सरकारमान्य धान्य दुकानांतून दिला जाणार आहे.
इचलकरंजीसारख्या वस्त्रोद्योगाच्या शहरामध्ये काबाडकष्ट करणाऱ्या कामगार कुटुंबीयांची संख्या अधिक आहे. यातील बहुतांश कुटुंबीयांना अल्प मजुरी मिळत असल्यामुळे त्यांना सरकारमान्य धान्याच्या दुकानातून मिळणाऱ्या धान्यावर अवलंबून राहावे लागते. शहरामध्ये एकूण ८४ हजार शिधापत्रिका असल्या तरी त्यापैकी दारिद्र्यरेषेखालील शिधापत्रिका ११ हजार ४९४ व अंत्योदय शिधापत्रिका ४ हजार ८०५ आहेत. याशिवाय २५ हजार केसरी शिधापत्रिकांपैकी १४ हजार शिधापत्रिकांना प्राधान्यक्रमाने धान्य दिले जाते.
एकूण मिळणाऱ्या शिधा पत्रिकांवरील धान्यांपैकी काही प्रमाणात धान्यांचा काळाबाजार होत असल्याच्या अनेक तक्रारी होत्या. त्याच्या विरोधात शहरातील विविध कामगार संघटनांनी वेळोवेळी आंदोलने केली आहेत.
सरकारमान्य धान्य दुकानातून मिळणाऱ्या धान्याचा काळाबाजार रोखण्यासाठी राज्य शासनाकडून बायोमेट्रिक पद्धतीचा अवलंब करण्यास सुरूवात केली आहे. त्यामध्ये प्राधान्यक्रमाने इचलकरंजी शहराचा समावेश व्हावा, यासाठी आमदार सुरेश हाळवणकर प्रयत्नरत आहेत. त्याला आता यश येत असून, शहरात असलेल्या १०३ सरकारमान्य धान्य दुकानांतून बायोमेट्रिक यंत्रे बसविण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. सध्या शिधापत्रिकांचे आधारकार्डाशी निगडित करण्याचे काम सुरू आहे. त्याचपाठोपाठ आता बायोमेट्रिक पद्धतीची यंत्रे सरकारमान्य दुकानात दाखल होण्यास सुरूवात होत आहे. याचबरोबर इचलकरंजी विधानसभा मतदारसंघातील अन्य पाच गावांमध्ये असलेल्या १४१ स्वस्त धान्यांच्या दुकानांत सुद्धा बायोमेट्रिक यंत्रे बसविली जाणार आहेत.
धान्य मिळण्यासाठी लाभार्थी असलेल्या शिधापत्रिकेवरील एका लाभार्थ्याला धान्य आणण्यासाठी संबंधित दुकानामध्ये जावे लागणार आहे. धान्य दुकानदाराकडून बायोमेट्रिक मशीनवर बोटाचे ठसे उमटविल्यानंतरच संबंधित शिधापत्रिकेला धान्य मिळणार
आहे. (प्रतिनिधी)