पक्षिनिरिक्षणात रंकाळ्यावर आढळले २३ प्रजातींचे पक्षी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 5, 2021 06:04 PM2021-01-05T18:04:07+5:302021-01-05T18:05:25+5:30
bird watching kolhapur- रंकाळा तलावावर विविध स्थानिक आणि स्थलांतरीत पक्ष्यांची रेलचेल आहे. विशेषत: पाणपक्षी, विविध जातीचे बगळे, वंचक, ग्रे हेरॉनसारख्या कधीही पहायला न मिळणारे २३ प्रजातींचे पक्षी पाहण्याचा आनंद चिल्लर पार्टीच्या ज्युनियर सदस्यांनी रविवारी घेतला.
कोल्हापूर : रंकाळा तलावावर विविध स्थानिक आणि स्थलांतरीत पक्ष्यांची रेलचेल आहे. विशेषत: पाणपक्षी, विविध जातीचे बगळे, वंचक, ग्रे हेरॉनसारख्या कधीही पहायला न मिळणारे २३ प्रजातींचे पक्षी पाहण्याचा आनंद चिल्लर पार्टीच्या ज्युनियर सदस्यांनी रविवारी घेतला.
चिल्लर पार्टी विद्यार्थी चित्रपट चळवळीच्या ज्युनियर सदस्यांसाठी हे पक्षिनिरिक्षण आयोजित करण्यात आले होते. कळंबा तलावावरील पक्षिनिरिक्षणानंतर रंकाळा तलावावरील या पक्षिनिरिक्षणात विविध प्रजातींच्या पक्षी मुलांना पहायला मिळाले.
चिल्लर पार्टीचे मिलिंद यादव यांनी या पक्ष्यांची प्रत्यक्ष ओळख करुन दिली. पक्षी कसे ओळखावेत, त्यांच्या सवयी कशा असतात, त्यांचे खाद्य काय, रहिवाशी पक्षी कोणते, स्थलांतरीत पक्षी कोणते, अशा प्रकारची सूक्ष्म माहिती यादव यांनी या मुलांना करुन दिली. सकाळी ७ वाजता संध्यामठ परिसरातून हे पक्षिनिरिक्षण सुरु करण्यात आले. रंकाळ्याच्या काठाकाठाने फिरुन दोन तासानंतर क्रशर चौकात या उपक्रमाचा समारोप करण्यात आला.
मुलांनी आपल्याकडील दुर्बिणीतून हे विविध प्रजातीचे पक्षी पाहिले. याशिवाय मोबाईलवरुन तसेच कॅमेऱ्यातून या पक्ष्यांची छायाचित्रेही काढली.
या पक्षिनिरिक्षणात चिल्लर पार्टीचे आर्षद आणि ईशान महालकरी, श्रीनाथ काजवे, मनस्वी आणि यशोवर्धन आडनाईक, चंद्रकांत तुदिगाल, घनश्याम लाड, ओंकार कांबळे, अनुजा बकरे आदी ज्युनियर सदस्य सहभागी झाले होते. या उपक्रमाचे आयोजन शिवप्रभा लाड, मिलिंद कोपार्डेकर, सलीम महालकरी यांनी केले.
रंकाळ्यावर आढळले हे पक्षी :
नाम्या, जांभळी पाणकोंबडी, जकाना किंवा कमळपक्षी, स्मॉल ब्ल्यू किंगफिशर, व्हाईट थ्रोटेड किंगफिशर, कवड्या धीवर, टिबुकली, लहान बगळा, वंचक, राखी बगळा, पाणकावळा, तुतारी, पिवळा धोबी, स्पॉट बिल्ड डक, सुरई (रिव्हरटर्न), शेकाट्या, तारवाली, टिटवी, वेडा राघू, रेड व्हेन्टेड बुलबुल, ब्राम्हणी घार, ब्लॅक हेडेड आयबीस