इचलकरंजीच्या नगराध्यक्ष बिरंजे यांचे बंड
By admin | Published: January 6, 2015 01:06 AM2015-01-06T01:06:02+5:302015-01-06T01:06:53+5:30
नगरपालिकेचे राजकारण : बंडास शहर विकास आघाडी, कारंडे गटाचा पाठिंबा
इचलकरंजी : येथील नगराध्यक्ष शुभांगी बिरंजे यांनी नगराध्यक्षपदाचा राजीनामा द्यावा, असा कॉँग्रेसच्या पक्षश्रेष्ठींचा आदेश फेटाळल्याने पालिका वर्तुळात जोरदार खळबळ उडाली. विशेष म्हणजे बिरंजे यांच्या बंडाला शहर विकास आघाडी व राष्ट्रवादी कॉँग्रेसमधील कारंडे गट यांनी जाहीरपणे पाठिंबा दिला.
इचलकरंजीचे नगराध्यक्षपद सर्वसाधारण महिला यासाठी आरक्षित आहे. जून २०१४ पासून अडीच वर्षासाठीच्या नगराध्यक्षपदासाठी सहा नगरसेविका इच्छुक असल्याने प्रत्येकी पाच महिने याप्रमाणे नगरसेवकांना नगराध्यक्षपद देण्याचा निर्णय कॉँग्रेसच्या पक्षश्रेष्ठींनी घेतला. त्याप्रमाणे २८ जूनपासून नगराध्यक्षपदी बिरंजे यांची निवड झाली. कालावधी पूर्ण झाल्यावर बिरंजे यांनी राजीनामा दिला नाही. अध्यक्षपदाचा राजीनामा देण्यास बिरंजे नकार देत असल्याने शहर कॉँग्रेसचे अध्यक्ष प्रकाश मोरे, पक्षप्रतोद सुनील पाटील, गटनेते बाळासाहेब कलागते यांच्या प्रमुख उपस्थितीत आज, सोमवारी कॉँग्रेसच्या नगरसेवक व नगरसेविकांची बैठक झाली. नगराध्यक्ष बिरंजे यांच्याकडे पालिकेत जाऊन राजीनामा मागण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला. दरम्यान, या बैठकीचा सुगावा शहर विकास आघाडी व राष्ट्रवादीतील कारंडे गटाला लागला. त्यामुळे नगराध्यक्ष बिरंजे यांच्या कार्यालयात ‘शविआ’चे प्रमुख सागर चाळके, पक्षप्रतोद अजित जाधव, कार्याध्यक्ष जयवंत लायकर, सयाजी चव्हाण, मदन झोरे, तानाजी पोवार, आक्काताई कोटगी, कारंडे गटाचे विठ्ठल चोपडे, माधुरी चव्हाण, आदींनी जाऊन त्यांच्या राजीनामा न देण्याच्या भूमिकेला पाठिंबा दिला. आणि हे सर्व नगरसेवक-नगरसेविका नगराध्यक्षांच्या कार्यालयात बसून राहिले. दुपारी साडेतीनच्या सुमारास कॉँग्रेसचे शहर अध्यक्ष मोरे, पक्षप्रतोद पाटील, गटनेते कलागते यांच्यासह सुमारे वीस नगरसेवक-नगरसेविका नगराध्यक्षांच्या कार्यालयात आले. त्यावेळी वातावरणात तणाव निर्माण झाला होता. सुरुवातीला शहर अध्यक्ष मोरे यांनी, नगराध्यक्ष बिरंजे यांचा ठरल्याप्रमाणे पाच महिन्यांचा कालावधी संपला आहे. पक्षश्रेष्ठींनी आपणास राजीनामा देण्यास सांगितले आहे, असे सांगितले. त्यावर बोलताना नगराध्यक्ष बिरंजे यांनी राजीनामा देण्यास स्पष्ट नकार दिला व त्या म्हणाल्या, मी कॉँग्रेसचीच नगराध्यक्ष आहे. शहराच्या विकासकामांसाठी अडीच वर्षे कालावधीकरीता नेत्यांनी नगराध्यक्षपदी निवडले आहे. त्यामुळे राजीनामा देण्याचा प्रश्नच नाही. यावर पक्षप्रतोद पाटील यांनी नगराध्यक्ष निवडीवेळी जून महिन्यात शहर कॉँग्रेसमध्ये झालेल्या बैठकीचा निर्वाळा दिला व ते म्हणाले, नगराध्यक्षपदासाठी सहा नगरसेविका इच्छुक असल्यामुळे सहा महिन्यांच्या कालावधीप्रमाणे नगराध्यक्षपद देण्याचा निर्णय झाला. यावेळी जातीने उपस्थित होता. तसेच पाच महिन्यानंतर राजीनामा देण्याचे कबूल केले होते. यावर नगराध्यक्षांनी तसे ठरले नव्हते, असे सांगून राजीनामा देण्यास नकार दिला. नगरसेविका रत्नप्रभा भागवत, सुरेखा इंगवले, तेजश्री भोसले, बिस्मिल्ला मुजावर, सुमन पोवार, श्रीरंग खवरे, संजय कांबळे, संजय तेलनाडे, आदींनी नगराध्यक्ष बिरंजे यांना सांगण्याचा प्रयत्न केला. यावेळी गोंधळ उडाला होता. मात्र, राजीनामा देण्यास बिरंजे यांनी नकार दिल्याने हा निर्णय पक्षश्रेष्ठींना कळवितो, असे सांगत कॉँग्रेसचे नगरसेवक निघून गेले.
‘बिरंजे यांना विकासासाठी ‘शविआ’चा पाठिंबा
शविआ’चे पक्षप्रतोद अजित जाधव म्हणाले, नगराध्यक्ष बिरंजे यांच्या अडीच वर्षाच्या कालावधीत काळम्मावाडी नळ योजना, आयजीएम हॉस्पिटल, शहरातील रस्ते, झोपडपट्टी पुनर्वसन, आरोग्य व स्वच्छता, आदी विकासात्मक कामे करण्याच्या उद्देशानेच शहर विकास आघाडीने पाठिंबा व्यक्त केला आहे. आम्ही १७ नगरसेवक त्यांच्या पाठीशी राहू.
पाटील-पोवार खडाजंगी
नगराध्यक्षांना कॉँग्रेसची भूमिका समजावून सांगत असताना पक्षप्रतोद सुनील पाटील यांनी चार वर्षांपूर्वी पाणीपुरवठा समितीच्या सभापतिपदी शुभांगी बिरंजे यांची निवड केल्याची आठवण त्यांना करून दिली. मात्र, त्यांना आणखीन एक वर्षाचा कालावधी वाढवून देत असताना गद्दारी झाल्याचा उल्लेख केला. त्यावेळी पाटील व ‘शविआ’चे नगरसेवक तानाजी पोवार यांच्यात जोरदार खडाजंगी झाली.
बिरंजेंना पाठिंबा : चोपडे
राष्ट्रवादी कॉँग्रेसचे शहर अध्यक्ष तथा नगरसेवक विठ्ठल चोपडे म्हणाले, पालिकेमध्ये दोन्ही कॉँग्रेसची आघाडी सत्तेत असून, आघाडीनेच बिरंजे यांची नगराध्यक्षपदी एकमताने निवड केली आहे. त्यामुळे राष्ट्रवादी कॉँग्रेसचा बिरंजे यांना पूर्णपणे पाठिंबा आहे.