भाजप सरकारच्या ‘अच्छे दिन’ची पुण्यतिथी
By admin | Published: May 31, 2016 01:08 AM2016-05-31T01:08:31+5:302016-05-31T01:17:57+5:30
जिल्हा काँग्रेस कमिटी : नैवेद्य दाखवून श्राद्ध घातले; केंद्र सरकारचा निषेध
कोल्हापूर : भाजप सरकारच्या ‘अच्छे दिन’ची दुसरी पुण्यतिथी सोमवारी जिल्हा काँग्रेस कमिटीत साजरी करण्यात आली. यावेळी सर्व विधिवत कार्यक्रमांसह नैवेद्य दाखवून प्रतिकात्मक श्राद्ध घालण्यात आले. भाजप सरकारला दोन वर्षे सत्तेवर येऊन पूर्ण झाली; पण लोकसभा निवडणुकीत दिलेल्या आश्वासनांची पूर्तता अद्याप केली नसल्याने हा निषेधार्थ प्रतीकात्मक कार्यक्रम करण्यात आला. यावेळी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष पी. एन. पाटील, शहराध्यक्ष प्रल्हाद चव्हाण, आदी उपस्थित होते.
भाजप सरकारला सत्तेत येऊन दोन वर्षे पूर्ण झाली. सत्तेत आल्यास १०० दिवसांत विदेशातील काळा पैसा परत आणून प्रत्येक नागरिकाच्या खात्यावर १५ लाख रुपये जमा करण्याची घोषणा केली होती. शेतीमालाला उत्पादन खर्चावर ५० टक्केनफा मिळेल, इतका भाव देण्याचे आश्वासन दिले होते. मागील दोन वर्षांत एकही आश्वसनपूर्ती झाली नाही. उलट एपीएलला स्वस्त धान्य देण्याकरिता सरकारकडून दिले जाणारे अंशदान बंद केले. सत्ताधारी पक्षातील भ्रष्ट नेते व मंत्र्यांवर कोणतीही कारवाई केलेली नाही. यामुळे या निद्रावलेल्या सरकारचे ‘अच्छे दिन’ दोन वर्षांतही न आल्याने त्याची दुसरी पुण्यतिथी जिल्हा काँग्रेस कमिटीत घालण्यात आली.
जिल्हाध्यक्ष पी. एन. पाटील म्हणाले, दोन वर्षांत भाजप सरकारने कोणतेही काम केले नसल्याने हे सरकार बिनकामाचे व मृत झाले आहे. त्याबद्दल त्याचे प्रतीकात्मक श्राद्ध घातले आहे. काँग्रेसने राबविलेल्याच योजनांचे नावे बदलून भाजप सरकारने त्याच योजना नव्याने आणल्या. शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढत आहेत. काँग्रेस आघाडी सरकारने शेतकऱ्यांची कोट्यवधी रुपयांची कर्जे माफ केली होती. त्यामुळे भाजपचे दिलेल्या आश्वासनाप्रमाणे ‘अच्छे दिन’ येण्यापूर्वीच संपुष्टात आले आहेत. या पार्श्वभूमीवर सर्वसामान्य जनतेच्यावतीने केंद्र सरकारचा निषेध करण्यात आला.
यावेळी प्रास्ताविक प्रसाद खोबरे यांनी केले. तर शहराध्यक्ष प्रल्हाद चव्हाण, माजी प्रदेश सरचिटणीस सुरेश कुराडे, नगरसेवक तौफीक मुल्लाणी, आदींची भाषणे झाली.
यावेळी संजय पाटील, जिल्हा परिषद अध्यक्षा विमल पाटील, उपाध्यक्ष शशिकांत खोत, जिल्हा बँकेच्या संचालिका उदयानी साळोखे, जिल्हा महिला आघाडी अध्यक्षा अंजनाताई रेडेकर, यूथ काँग्रेसचे अध्यक्ष शंभुराजे देसाई, शंकर पाटील, महिला युवक काँग्रेसच्या सरचिटणीस रूपाली पाटील, वैशाली महाडिक, एस. के. माळी, नीलेश यादव, पी. डी. धुंदरे, आदी उपस्थित होते.
हार, फुले अन् नैवेद्य
काँग्रेस कमिटीबाहेर टेबलावर श्राद्धचे विधिवत कार्यक्रम केले. त्यावेळी हार, फुले वाहून आगरबत्ती लावून नैवद्य दाखविण्यात आला. त्यावेळी भाजप सरकारच्या निषेधाच्या घोषणाही यावेळी देण्यात आल्या.
केंद्रातील भाजप सरकारने लोकसभा निवडणुकीतील आश्वासनपूर्ती केली नसल्याच्या निषेधार्थ सोमवारी काँग्रेस कमिटीत ‘अच्छे दिन’ची पुण्यतिथी घालण्यात आली. यावेळी अध्यक्ष पी. एन. पाटील, प्रल्हाद चव्हाण, वैशाली महाडिक, दयानंद नागटिळे, संपतराव चव्हाण, शंकरराव पाटील, तौफिक मुल्लाणी, संजय पाटील, अंजनाताई रेडेकर, सुरेश कुराडे, आदी उपस्थित होते.