कागल तालुक्यात मुलींचा जन्मदर कमी... भाग १
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 27, 2021 04:28 AM2021-08-27T04:28:29+5:302021-08-27T04:28:29+5:30
कोल्हापूर : कागल तालुक्यात जिल्ह्यातील सर्वात कमी मुलींचा जन्मदर असून, दरहजारी मुलींच्या जन्मदारामध्ये ...
कोल्हापूर : कागल तालुक्यात जिल्ह्यातील सर्वात कमी मुलींचा जन्मदर असून, दरहजारी मुलींच्या जन्मदारामध्ये चंदगड तालुका अव्वल ठरला आहे. जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. योगेश साळे यांनी ही आकडेवारी जाहीर केले. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण यांनी चंदगड तालुक्याचे अभिनंदन केले.
जून महिनाअखेरच्या आकडेवारीनुसार कोल्हापूर जिल्ह्यात सरासरी दर हजार मुलांमागे ९२८ मुली असे प्रमाण आहे. हेच प्रमाण चंदगड तालुक्यात दरहजारी मुलांमागे १००९ मुली असे आहे. म्हणजेच मुलांपेक्षा या तालुक्यात मुलींच्या जन्माचे प्रमाण जास्त आहे. जिल्ह्यातील हातकणंगले, शाहूवाडी, शिरोळ आणि गडहिंग्लज या तालुक्यांची महिला व पुरुष प्रमाणाची स्थिती साधारण आहे. गगनबावडा, करवीर, आजरा, भुदरगड, राधानगरी, पन्हाळा आणि कागल तालुक्यांमध्ये तुलनेने महिला आणि पुरुष प्रमाण कमी आहे. या तालुक्यांमध्ये दरहजारी मुलांच्यामागे मुलींचे प्रमाण वाढवण्यासाठी सातत्याने प्रयत्न करण्यात येत आहेत. महिलांचे प्रबोधन करण्यात येत असून, गर्भलिंग निदान कायद्याचीही कडक अंमलबजावणी सुरू असल्याचे सांगण्यात आले.
आरोग्य विभागाच्या विविध योजनांची माहिती आणि लाभ देताना मुलींचा जन्मदर वाढवण्यासाठी सातत्याने प्रयत्न सुरू असून, याला नागरिकांनीही विधायक प्रतिसाद द्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.