कोल्हापूर जिल्ह्यातील पन्हाळ्यात मुलींचा जन्मदर घटला, तालुकावार मुलींचे प्रमाण..जाणून घ्या
By ऑनलाइन लोकमत | Published: September 19, 2023 06:00 PM2023-09-19T18:00:36+5:302023-09-19T18:01:05+5:30
कायदेशीर कडक कारवाईच्या सूचना
कोल्हापूर : एक हजार मुलांमागे सर्वांत कमी मुली जन्माला येण्याचे प्रमाण पन्हाळा तालुक्यात अधिक असून यावर सोमवारी झालेल्या सर्वसाधारण सभेत चर्चा करण्यात आली. त्यापाठोपाठ करवीर तालुक्यात ८९३ मुलींचा जन्म होत असून आई- वडिलांच्या प्रबोधनावर जाेर देतानाच कायदेशीर कडक कारवाईच्या सूचना मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष पाटील यांनी दिल्या.
समिती सभागृहात झालेल्या सुमारे पाच तास चालेल्या या सभेत सर्व विभागांचा सविस्तर आढावा घेण्यात आला. पाटील म्हणाले, १ हजार मुलांमागे १००२ मुलींचा जन्मदर ठेवत चंदगड तालुक्याने जिल्ह्यात अव्वल स्थान प्राप्त केले आहे. सर्वच तालुक्यांमध्ये एकूणच मुलींचा जन्मदर वाढावा यासाठी नियोजनपूर्वक काम करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
या सभेत निर्लेखनाच्या १० पैकी ७ प्रस्तावांना मान्यता देण्यात आली; परंतु कुटवाड, ता. शिरोळ येथील समाजमंदिर, मोघर्डे, ता. राधानगरी येथील समाजमंदिर करंजफेण, ता. पन्हाळा येथील शाळा खोलीचा निर्लेखनाचा प्रस्ताव तूर्त थांबवण्यात आला असून पुन्हा या प्रस्तावांची छाननी करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. उर्वरित सात इमारती या १९८१ पूर्वीच्या असल्याने त्यांच्या निर्लेखनास मान्यता देण्यात आली. बांधकाम विभागाकडून आलेल्या ७५ लाखांपेक्षा अधिक रकमेच्या १० निविदांनाही यावेळी मंजुरी देण्यात आली.
डॉ. जे. पी. नाईक समृद्ध शाळा योजना पुन्हा सुरू करण्याचा निर्णयही यावेळी घेण्यात आला. तसेच करवीर तालुक्यातील भुयेवाडी येथील कन्या आणि कुमार विद्यामंदिर या दोन शाळांच्या एकत्रीकरणाचा प्रस्तावही मंजूर करण्यात आला. पदाधिकारी, अधिकारी निवासस्थाने या ठिकाणी साफसफाई, सुरक्षारक्षक नेमण्यास मान्यता देण्यात आली आहे. यावेळी सर्व विभागप्रमुख उपस्थित होते.
तालुका दर एक हजार मुलांमागे मुलींचे प्रमाण
चंदगड - १००२
गडहिंग्लज - ९५७
हातकणंगले - ९५१
गगनबावडा - ९४६
शाहूवाडी - ९३९
कागल - ९३२
शिरोळ - ९२३
भुदरगड - ९२१
आजरा - ९२१
राधानगरी - ९१६
करवीर - ८९३
पन्हाळा - ८८०