वाढदिवस कार्यक्रमात घुसून हल्ला; पाच गंभीर
By admin | Published: June 23, 2015 01:00 AM2015-06-23T01:00:44+5:302015-06-23T01:00:44+5:30
आठजणांवर गुन्हा : माजी नगरसेविका रेखा आवळेंच्या मुलाचा सुरू होता वाढदिवस
कोल्हापूर : पूर्ववैमनस्यातून कदमवाडी, कपूर वसाहतीमध्ये माजी नगरसेविका रेखा अनिल आवळे यांच्या मुलाच्या वाढदिवस कार्यक्रमात सात ते आठजणांनी घुसून केलेल्या खुनी हल्ल्यात पाचजण गंभीर जखमी झाले.
जॉनी गौतम मोहिते (वय २४, रा. जाधववाडी), अजिज राजू शेख (१९), सतीश परशुराम नलवडे (१९), विकी नागेश वडर (१९), सनी तिम्मा वडर (१९, सर्व रा. विचारेमाळ) अशी जखमींची नावे आहेत. या हल्ल्यानंतर परिसरात तणाव पसरल्याने पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला. ही घटना सोमवारी रात्री साडेदहाच्या सुमारास घडली.
याबाबत जखमी जॉनी मोहिते याने सीपीआर पोलिसांना सांगितले, माजी नगरसेविका रेखा आवळे यांचा मुलगा धीरज याच्या वाढदिवसाचा कार्यक्रम सोमवारी रात्री सुरू होता. (त्याला शुभेच्छा देण्यासाठी आम्ही मित्र परिवारांनी मोठी गर्दी केली होती. दरम्यान, अचानक संशयित आरोपी अमर मुंगळे, साजन मुंगळे, आकाश मुंगळे, रोहन मुंगळे, करण मुंगळे आदींसह सात ते आठजण वाढदिवस कार्यक्रम सुरू असताना घुसले. त्यांनी माझ्या डोक्यात कोयत्याने वार केला. मी रक्तबंबाळ होऊन जमिनीवर कोसळलो. यावेळी त्यांनी माझे मित्र अजित शेख, सतीश नलवडे, विकी वडर, सनी वडर आदींवरही हल्ला चढविला. त्यानंतर ते पळून गेले. त्यांनी पूर्ववैमनस्यातून हल्ला केल्याचेही त्याने पोलिसांना सांगितले. (प्रतिनिधी)
पोलिसांचे संचलन
या हल्ल्यानंतर कदमवाडी, विचारेमाळ येथील तरुणांनी सीपीआरमध्ये मोठी गर्दी केली होती. या घटनेची माहिती समजताच शाहूपुरी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत परिसरात संचलन केले. त्यानंतर रात्री उशिरा जॉनी मोहिते याने संशयितांच्या विरोधात फिर्याद दिली.