बिष्णोई टोळीतील कुख्यात गुंडास कोल्हापुरात अटक

By ऑनलाइन लोकमत | Published: June 21, 2022 07:08 PM2022-06-21T19:08:59+5:302022-06-22T13:46:10+5:30

सात दिवसांपासून कोल्हापुरात वास्तव्य

bishnoi gang gangster arrested in Kolhapur in murder case of singer Sidhu Musewala | बिष्णोई टोळीतील कुख्यात गुंडास कोल्हापुरात अटक

बिष्णोई टोळीतील कुख्यात गुंडास कोल्हापुरात अटक

googlenewsNext

कोल्हापूर : प्रसिद्ध पंजाबी गायक आणि काँग्रेस नेते सिद्धू मुसेवाला यांच्या हत्या प्रकरणातील कुख्यात लॅरिन्स बिष्णोई टोळी आणि कॅनडा येथील गोल्डी ब्रार यांच्या संपर्कात असलेल्या कुख्यात गुंडास मंगळवारी कोल्हापूर पोलिसांनी अटक केली. मोहित ऊर्फ शेराजगबीरसिंग मलिक (वय २६, रा. बिधल, ता. गौहाना, जि. सोनिपत, हरियाना) असे त्याचे नाव आहे. कोल्हापूर स्थानिक गुन्हे अन्वेषण पोलिसांनी ही कारवाई केली. कोल्हापुरात रंकाळा तलाव परिसरात पैलवान बनून तो आठवडाभर राहत होता, असे तपासात स्पष्ट झाले आहे.

मे महिन्यात मुसेवाला यांची हत्या झाली होती. या हत्येची जबाबदारी कॅनडाच्या लॉरेन्स टोळीने घेतल्याचे तपासात पुढे आले आहे. या टोळीशी आणि बिष्णोई टोळीशी संपर्कात गुंड मलिक असल्याचे हरियाना पोलिसांच्या तपासात पुढे आले. हरियाना पोलिसात त्याच्यावर गंभीर गुन्हेही दाखल आहेत. म्हणून त्याचा शोध पोलीस घेत होते. पण तो पोलिसांना गुंगारा देत राहिला.

हा आरोपी कोल्हापुरात आल्याचे पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांना समजले. बलकवडे यांनी गुन्हे अन्वेषणचे पोलीस निरीक्षक संजय गोर्ले यांना तपास करण्याचे आदेश दिले. अत्याधुनिक तंत्रज्ञान व तांत्रिक साधनांचा वापर करून त्याचे गुंड मलिकचे लोकेशन शोधल्यानंतर तो रंकाळा परिसरात असल्याचे समोर आले. फोटोच्या आधारे साध्या वेशातील पोलिसांनी तो राहत असलेल्या खोलीवर पाळत ठेवली. मंगळवारी सकाळी तो रंकाळा टॉवर परिसरात फिरण्यासाठी गेला.

पाळतीवरील पोलिसांनी त्याच्याजवळ हत्यार असण्याची शक्यता गृहीत धरून नियोजनबध्दपणे त्याला ताब्यात घेतले. त्याच्याकडे कसून चौकशी केल्यानंतर त्याने आपले नाव मोहित मलिक असल्याचे सांगितले. आपल्यावर दाखल असलेल्या गुन्ह्यांची माहिती देताच पोलीसही अआक् बनले. त्यानंतर त्याला पोलिसांनी अटक केली. सहाय्यक पोलीस निरीक्षक किरण भोसले, उपनिरीक्षक महादेव कुऱ्हाडे यांच्या पथकाने ही कारवाई केली.

भाड्याच्या खोलीत वास्तव्य

गुंड मलिक फरार झाल्यानंतर दिल्ली, उज्जैन, उत्तराखंड, इसार अशा ठिकाणी राहिला. हरियाणातून काही मल्ल पैलवानकी करण्यासाठी कोल्हापुरातील रंकाळा टॉवर परिसरात भाड्याच्या खोलीत राहत असल्याची माहिती त्याला मिळाली. तोही आपली मूळ ओळख लपवून पैलवान ज्याप्रमाणे खोली घेऊन राहतात, त्याप्रमाणे रंकाळा टॉवर परिसरात भाड्याची खोली घेऊन सात दिवस राहिला. रंकाळा पदपथावर फिरताना पोलिसांनी त्याला जेरबंद केले.

अत्यंत खतरनाक गुन्हेगार

पिस्तूलने खून करणे, खुनाचा प्रयत्न, दरोडा, खंडणी असे अतिशय गंभीर गुन्हे गुंड मलिक याच्यावर आहेत. नेहमी जवळ पिस्तूल आणि घातक हत्यार घेऊन वावरत असल्याने त्याची ओळख अत्यंत खतरनाक गुन्हेगार अशी आहे. तो वयाच्या १६ व्या वर्षापासून गुन्हेगारीत आहे. २०११-१२ मध्ये पिस्तुलातून गोळ्या झाडून त्याने पहिला खून केल्याची माहितीही पोलिसांनी दिली.

बक्षीस जाहीर, पण...

हरियाणा पोलिसांनी मलिकची माहिती देणाऱ्यास विशेष बक्षीस जाहीर केले होते. पण तो तेथील पोलिसांना मिळत नव्हता. कोल्हापूर पोलिसांनी गोपनीय पध्दतीने माहिती काढून या आंतरराज्य टोळीतील गुन्हेगारास अटक केली. यामुळे कोल्हापूर पोलिसांचे कौतुक होत आहे.

Web Title: bishnoi gang gangster arrested in Kolhapur in murder case of singer Sidhu Musewala

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.