सा. रे. पाटील यांचे पुन्हा एकतर्फी वर्चस्व
By admin | Published: July 22, 2014 11:46 PM2014-07-22T23:46:09+5:302014-07-22T23:59:45+5:30
दत्त कारखाना निवडणूक : विधानसभेला राजकीय गणित बदलणार
संदीप बावचे- शिरोळ
गेल्या बेचाळीस वर्षांच्या इतिहासात प्रथमच दत्त साखर कारखान्याची निवडणूक बिनविरोध झाल्याने सत्ताधारी गटाचे प्रमुख आ. सा. रे. पाटील यांनी ‘दत्त’वरील आपले पुन्हा एकदा एकतर्फी वर्चस्व सिद्ध करून दाखविले आहे. बिनविरोधचा हा निकाल तालुक्याच्या राजकारणावर परिणाम करणारा ठरणार आहे.
आगामी विधानसभा निवडणुकीकडे तालुक्याचे लक्ष लागून राहिले आहे. ऊसदराच्या प्रश्नावरून आंदोलन म्हटले की, स्वाभिमानी शेतकरी संघटना आलीच. ‘दत्त’च्या या आंदोलन केंद्रातून खा. राजू शेट्टी यांची कारकीर्द सुरू झाली होती. या चळवळीतून खा. शेट्टी लोकसभेत पोहोचले. नुकत्याच झालेल्या लोकसभा निकालानंतर श्री दत्त साखर कारखान्याच्या निवडणुकीत खा. शेट्टी यांच्या नेतृत्वाखालील पॅनेल उभे राहील, अशी शक्यता वर्तविली जात होती. मात्र, मल्टिस्टेट कायद्यातील जाचक अटींमध्ये कारखान्याने मनमानी नियम केल्याचा आरोप करून स्वाभिमानी शेतकरी संघटनेने ‘दत्त’च्या या रणांगणातून माघार घेण्याचा निर्णय घेतला होता.
या निर्णयामुळे ‘स्वाभिमानी’चे नेतृत्व मानणाऱ्या शेतकरी सभासदांत संभ्रमावस्था निर्माण झाली. या निवडणुकीत स्वाभिमानीकडून एकही अर्ज दाखल झाला नाही. त्यामुळे ‘दत्त’ची ही निवडणूक बिनविरोध होणार यावर शिक्कामोर्तब झाले. वास्तविक मल्टिस्टेट कायद्याच्या अनुषंगाने सर्व बाबींची पूर्तता स्वाभिमानी शेतकरी संघटनेने करणे गरजेचे होते. निवडणूक जाहीर झाल्यानंतर दत्त उद्योग समूहाचे प्रमुख आ. सा. रे. पाटील यांनी राजकारणातील डावपेच खेळून आपली ४० वर्षांतील ‘दत्त’वरील पकड कायम असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध केले आहे.
वयाच्या ९४व्या वर्षी देखील त्यांची काम करण्याची पद्धत निश्चित वाखाणण्यासारखी आहे. राजकारणापेक्षा सामाजिक विकास, वैचारिक परिवर्तन व उत्कृष्ठ प्रशासनाची सांगड घालून ‘दत्त’ उद्योग समूहात केलेली लक्षणीय प्रगती याची प्रचितीच या निकालातून स्पष्ट झाली आहे.
आगामी विधानसभेच्या पार्श्वभूमीवर ‘दत्त’चा हा निकाल राजकीय गणित मांडणारा ठरणार आहे. कारखान्याच्या निवडणुकीत सा. रे. पाटील यांनी मिळविलेल्या यशामुळे सध्या ‘फिलगूड’चे वातावरण तयार झाले आहे.