कोल्हापुरात मुन्ना-बंटी एकत्र आले, पण...; राजकीय चर्चांना उधाण
By राजाराम लोंढे | Published: October 21, 2023 02:03 PM2023-10-21T14:03:35+5:302023-10-21T14:04:14+5:30
कोल्हापूर : खासदार धनंजय महाडीक व काँग्रेसचे विधानपरिषदेचे गटनेते, आमदार सतेज पाटील हे ‘रामेती’च्या कार्यक्रमांनिमित्त शनिवारी एकत्र आले, पण ...
कोल्हापूर : खासदार धनंजय महाडीक व काँग्रेसचे विधानपरिषदेचे गटनेते, आमदार सतेज पाटील हे ‘रामेती’च्या कार्यक्रमांनिमित्त शनिवारी एकत्र आले, पण त्या दोघांमधील अबोला कायम राहिला. हे दोघे एकत्र आल्याने उपस्थितांच्या नजरा दोघांकडे लागल्या होत्या.
वसंतराव नाईक राज्य कृषी विस्तार व्यवस्थापन प्रशिक्षण संस्था (वनामती), नागपूर अधिनस्त नवीन बांधलेल्या प्रादेेशिक कृषी विस्तार व्यवस्थापन प्रशिक्षण संस्था (रामेती), कोल्हापूर यांच्या प्रशिक्षणार्थी वसतीगृह इमारतीच्या उदघाटनानिमित्त पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या समवेत खासदार महाडीक, आमदार पाटील हे एकत्र आले होते. मंत्री मुश्रीफ यांच्या दोन्ही बाजूला हे दोन तरुण नेते उभे होते, या दोघांमध्ये संवाद होईल असे काहींना वाटत होते. मात्र, त्यांनी एकमेकांकडे बघणेही टाळले.
खुर्चीही मोकळी..
इमारत उदघाटनापुर्वी पाहुण्यांसाठी अल्पोहार ठेवला होता. खासदार महाडीक व आमदार पाटील हे एकाच टेबलावर बसले होते, मात्र दोघांमधील एक खुर्ची मोकळी होती. याचीही उपस्थितांमध्ये जोरदार चर्चा सुरु होती.
एकत्र फेटे बांधून घेतले
दरम्यानच या कार्यक्रमाच्या सुरुवातील पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी महाडीक-पाटील यांना सोबत घेऊन एकत्र फेटे बांधून घेतले. मंत्री मुश्रीफ मध्ये अन् महाडीक-पाटील बाजूला बसले होते. माध्यमांचे कॅमेरे बघताच दोघांच्याही चेहऱ्यावर हसू उमटले.