कचरा घोटाळ्यावरुन भाजप कार्यकर्त्यांचा अतिरिक्त आयुक्तांना घेराव; फौजफाट्यासह पोलीस बैठक कक्षात
By ऑनलाइन लोकमत | Published: February 9, 2022 07:43 PM2022-02-09T19:43:23+5:302022-02-09T19:57:42+5:30
संतप्त झालेल्या भाजप कार्यकर्त्यांनी अतिरिक्त आयुक्त नितीन देसाई यांना घेराव घातल्याने पालिकेतील वातावरण तंग
कोल्हापूर : कचरा घोटाळ्यात मनपा प्रशासनाने कोणतीही कारवाई केली नसल्यामुळे आणि आंदोलनाला अधिकारी सामोरे न आल्यामुळे संतप्त झालेल्या भाजप कार्यकर्त्यांनी अतिरिक्त आयुक्त नितीन देसाई यांना घेराव घालून घोषणाबाजी केली. यामुळे पालिकेतील वातावरण तंग झाले.
शेवटी पोलिसांनी हस्तक्षेप करून कार्यकर्त्यांची समजूत काढल्यानंतर व दोन दिवसांत चौकशी अहवाल सादर करण्याचे आश्वासन अतिरिक्त आयुक्तांनी दिल्यानंतर आंदोलन स्थगित करण्यात आले.
एक महिन्यापूर्वी भारतीय जनता पार्टीने कचरा घोटाळा उघडकीस आणल्यानंतरही चौकशी समितीचा अहवाल सादर झाला नसल्यामुळे भाजपाने बुधवारी मनपावर धडक देऊन निदर्शने करण्याचे जाहीर केले होते. त्याप्रमाणे सकाळी महानगरपालिकेच्या दारात निदर्शनांना सुरुवात केली. ‘कचरा घोटाळ्यात सहभागी असणाऱ्या विजय पाटलांना निलंबित करा,’ असे फलक हातात घेऊन आलेल्या कार्यकर्त्यांनी घोषणांनी मनपा परिसर दणाणून सोडला.
एक तास चाललेल्या आंदोलनानंतरही अधिकारी सामोरे न आल्यामुळे संतप्त झालेल्या जिल्हाध्यक्ष राहुल चिकोडे यांनी कार्यकर्त्यांना मनपात घुसण्याचे आवाहन केले. त्यानंतर कार्यकर्ते आयुक्तांच्या केबिनकडे गेले. परंतु काही वेळाने अतिरिक्त आयुक्त कार्यकर्त्यांसमोर आल्यामुळे संतप्त झालेल्या कार्यकर्त्यांनी त्यांना घेराव घातला.
यावेळी शहर पोलीस उपअधीक्षक मंगेश चव्हाण फौजफाट्यासह बैठक कक्षात दाखल झाले. शेवटी पोलिसांनी हस्तक्षेप करून कार्यकर्त्यांची समजूत काढल्यानंतर व दोन दिवसांत चौकशी अहवाल सादर करण्याचे आश्वासन अतिरिक्त आयुक्तांनी दिल्यानंतर आंदोलन स्थगित करण्यात आले.
यावेळी जिल्हाध्यक्ष राहुल चिकोडे, जिल्हा सरचिटणीस विजय जाधव, अजित ठाणेकर, हेमंत आराध्ये, गायत्री राऊत, चंद्रकांत घाटगे, दिलीप मेत्रानी, हेमंत आराध्ये, गणेश देसाई, जिल्हा उपाध्यक्ष चंद्रकांत घाटगे, विजय आगरवाल, किशोरी स्वामी, जिल्हा चिटणीस प्रदीप उलपे, दिग्विजय कालेकर, अजित सूर्यवंशी, सुलभा मुजुमदार उपस्थित होते.