Kolhapur: ..अन्यथा सोयीची भूमिका घेवून ताकद दाखवू, भाजप नेते डॉ. संजय पाटील यांनी दिला इशारा
By ऑनलाइन लोकमत | Published: September 30, 2024 03:59 PM2024-09-30T15:59:44+5:302024-09-30T16:01:45+5:30
कुरुंदवाड येथे भाजप कार्यकर्त्यांचा मेळावा
कुरुंदवाड : देशात, राज्यात भाजप मोठा पक्ष असतानाही जिल्ह्यातील सहकारात भाजपाला मोजले जात नाही, हे दुर्दैव आहे. त्यामुळेच कार्यकर्ते पदापासून वंचित आहेत. शिरोळ तालुक्यात भाजपा कार्यकर्त्यांची ताकद आहे. त्यामुळे विधानसभा निवडणुकीत तालुक्यात भाजपचाच उमेदवार द्यावा अन्यथा आम्हाला वेगळा विचार करावा लागेल, असा इशारा भाजप नेते व पंचायतराज समिती प्रमुख डॉ. संजय पाटील यांनी केले.
येथील संजय सांस्कृतिक सभागृहामध्ये शिरोळ तालुका भाजपा कार्यकर्ता संवाद मेळाव्यात डॉ. पाटील बोलत होते. अध्यक्षस्थानी माजी नगराध्यक्ष रामचंद्र डांगे होते. डॉ. पाटील म्हणाले, जिल्ह्यातील सहकारातील निवडणुकीत भाजपा कार्यकर्त्याला संधी दिली जात नाही, अशी खंत व्यक्त केली. विधानसभा निवडणुकीत जिल्ह्यात पक्षाला किमान चार जागा मिळाव्यात. त्यातही शिरोळ विधानसभेसाठी पक्षाचाच उमेदवार असावा अन्यथा आम्ही सोयीची भूमिका घेवून आपली ताकद दाखविली जाईल, असा इशारा त्यांनी दिला.
माजी नगराध्यक्ष डांगे म्हणाले, निवडणुकीत उमेदवारी मागण्याचा प्रत्येकाला अधिकार आहे. मात्र काम करणाऱ्या व्यक्तीलाच पक्ष बोलावून तिकीट देतो ही भाजपची पद्धत आहे. पक्षातील जुना नवा वाद असा न करता तालुक्यातील पक्ष वाढण्यासाठी प्रत्येकांनी प्रामाणिक प्रयत्न करावा आणि पक्षाने देतील ते उमेदवार निवडून आणण्याचे आवाहन डांगे यांनी केले.
मेळाव्यात भाजपचे कार्यकर्ते संजय माने यांना मयूर उद्योग समूहाच्या वतीने तीनचाकी मोटारसायकल डॉ. पाटील यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. यावेळी भाजपा युवा आघाडी प्रदेश सचिव ॲड. सुशांत पाटील, संजय माने, आदलिंग चौगुले आदींची भाषणे झाली. मेळाव्यास सुनिल पाटील, मुकुंद पुजारी, महावीर तकडे, पोपट पुजारी, सुमित पाटील, जयपाल माणगांवे यांच्यासह भाजपा कार्यकर्ते उपस्थित होते. अविनाश शंभूशेट्टी यांनी आभार मानले.