बेळगावात भाजपने इतिहास बदलला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 7, 2021 04:29 AM2021-09-07T04:29:12+5:302021-09-07T04:29:12+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क बेळगाव : बेळगाव महापालिकेच्या निवडणुकीत ५८ पैकी ३५ जागा जिंकत भारतीय जनता पक्षाने ऐतिहासिक विजय ...

BJP changed history in Belgaum | बेळगावात भाजपने इतिहास बदलला

बेळगावात भाजपने इतिहास बदलला

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

बेळगाव : बेळगाव महापालिकेच्या निवडणुकीत ५८ पैकी ३५ जागा जिंकत भारतीय जनता पक्षाने ऐतिहासिक विजय मिळवला आहे. यामुळे प्रथमच बेळगावचा महापौर हा एखाद्या राष्ट्रीय पक्षाचा असणार आहे. काँग्रेस आणि महाराष्ट्र एकीकरण समितीसह अन्य पक्षांना अनुक्रमे १० व १३ जागांवर समाधान मानावे लागले आहे.

बेळगाव महापालिका निवडणुकीसाठी शुक्रवारी मतदान झाले होते. मतमोजणी सोमवारी कॅम्प येथील बी. के. मॉडेल हायस्कूल येथे कडक पोलीस बंदोबस्तात पार पडली. मतमोजणीत धक्कादायक निकाल समोर आले. महापालिकेवर यापूर्वी सातत्याने वर्चस्व राखणाऱ्या महाराष्ट्र एकीकरण समितीला अवघ्या चार जागा जिंकता आल्या. काँग्रेसला १० जागांवर विजय मिळाला. ८ अपक्ष उमेदवार निवडून आले तर एमआयएमने एक जागा जिंकून चंचूप्रवेश केला.

महाराष्ट्र एकीकरण समितीतर्फे रवी साळुंके, बसवराज मोदगेकर, वैशाली भातकांडे, शिवाजी मंडोळकर हे उमेदवार विजयी झाले असले तरी मराठी भाषिक ज्योती कडोलकर या काँग्रेसतर्फे विजयी झाल्या आहेत. या व्यतिरिक्त पूजा पाटील व शंकर पाटील या अपक्ष उमेदवारांनी प्रतिस्पर्ध्यांना पराभूत केले आहे.

चौकट

पक्षीय चिन्हावर प्रथमच निवडणूक

यापूर्वी बेळगाव महापालिका निवडणूक भाषिक मुद्यांवर लढविली जात होती. मात्र, यावेळी भाजप, काँग्रेस, निजद, आम आदमी, एमआयएम आदी राजकीय पक्ष निवडणूक रिंगणात उतरल्याने पक्षांच्या चिन्हांवर ही निवडणूक लढविली आणि त्यामध्ये भाजपची सरशी झाली. निवडणुकीचा निकाल जाहीर होताच विजयी उमेदवारांच्या समर्थकांनी गुलालाची उधळण करीत एकच जल्लोष केला.

चौकट

महापालिकेत ५५ नवे चेहरे

बेळगाव महापालिकेच्या निवडणुकीत केवळ तीन माजी नगरसेवकांना मतदारांनी पुन्हा संधी दिली असून, तब्बल ५५ नव्या चेहऱ्यांना निवडून दिले आहे. यातील बहुतांश नगरसेवक तरुण आहेत. विशेष म्हणजे विजयी उमेदवारांमध्ये २२ मराठी आणि १४ मुस्लिम उमेदवार निवडून आले आहेत. भाजपच्या विजयी उमेदवारांमध्ये १५ मराठी भाषिक आहेत.

चौकट

का मिळाली भाजपला सत्ता?

बेळगाव महापालिकेच्या निवडणुकीत आरक्षणाबरोबरच अवैज्ञानिक प्रभाग पुनर्रचनेचा फायदा भाजपला मिळाला आहे. तसेच लोकसभा निवडणूक, तसेच अन्य राष्ट्रीय मुद्द्यांवर हिंदुत्वाचा पुरस्कार करणाऱ्या भारतीय जनता पक्षाच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याच्या बेळगावसह सीमा भागातील मराठी भाषिक जनतेच्या मनोवृत्तीचाही लाभ भाजपला मिळाला आहे.

Web Title: BJP changed history in Belgaum

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.