कागलच्या राजकारणात ट्विस्ट! समरजित घाटगे गेले कुणीकडे, भूमिकेविषयी जिल्ह्यात उत्सुकता
By समीर देशपांडे | Published: July 4, 2023 12:24 PM2023-07-04T12:24:53+5:302023-07-04T12:45:47+5:30
सोशल पोस्टपासून बातम्याबाबतही जागरूक असलेले घाटगे या घडामोडींबद्दल काहीच बोलत नसल्याने तर्कवितर्क
समीर देशपांडे
कोल्हापूर : भाजपचे जिल्हाध्यक्ष आणि कागल मतदारसंघातील उमेदवारीचे भक्कम दावेदार समरजित घाटगे नेमके गेले कुणीकडे, असा सवाल विचारला जात आहे. कारण हसन मुश्रीफ यांनी कॅबिनेट मंत्री म्हणून शपथ घेतल्यानंतर त्यांचा ठावाठिकाणाच कोणी अधिकृत सांगत नसून ते फोनही घेत नाहीत. व्हॉट्सॲपवरील मेसेजलाही ते उत्तर देत नाहीत. चंदगडच्या उमेदवारीचे दावेदार भाजपचे शिवाजी पाटील हे अक्कलकोटला स्वामी समर्थांच्या दर्शनासाठी गेले आहेत.
गेल्या विधानसभेला अपक्ष समरजित घाटगे यांनी कडवी टक्कर देत मुश्रीफ यांना जेरीस आणले होते. पराभव झाल्यानंतर मात्र त्यांनी दुसऱ्या दिवसापासून पायाला भिंगरी लावली. मतदारसंघातील अनेक गावे त्यांनी चार वर्षांत पालथी घातली. मतदारसंघातील प्रत्येक प्रश्न मांडत राहिले, मुश्रीफ महाविकास आघाडीत मंत्री असतानाही त्यांना घाटगे यांनी अंगावर घेतले.
संपर्क, जोडीला गेल्या वर्षभरात आणलेला निधी, सोशल मीडिया, छोट्या छाेट्या जोडण्या या सगळ्यांमध्ये घाटगे कोठेही कमी पडत नव्हते. परंतु, दिल्लीच्या पातळीवरचा निर्णय रविवारी मुंबईत अंमलात आला आणि मुश्रीफच आता कॅबिनेट मंत्रिपद घेऊन करवीर नगरीत येणार आहेत. समरजित यांच्यासाठी हा फार मोठा धक्का आहे.
रविवारी ते कोल्हापूरमध्येच असल्याचे सांगण्यात येते. कारण निपाणीचे जोल्ले दाम्पत्याने रविवारी घरी भेट दिल्याचे फोटो त्यांनीच फेसबुकवरून शेअर केले आहेत. परंतु, या मोठ्या उलथापालथीनंतर समरजित यांचा माध्यमांशी संपर्कच झालेला नाही. सोशल पोस्टपासून बातम्याबाबतही जागरूक असलेले घाटगे या घडामोडींबद्दल काहीच बोलत नसल्याने तर्कवितर्क व्यक्त होत आहेत. ते भाजपचा राजीनामा देणार अशीही चर्चा सोशल मीडियावर कालपासून चर्चेत आहे.
समरजित यांच्यासमोरील पर्याय
- उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी बोलून भावी उज्ज्वल भवितव्य आहे असा आशावाद ठेवून भाजपमध्येच राहणे.
- वेळ पडल्यास पक्षाच्या विरोधात बंड
- घाटगे हे लगेचच पक्षाविरोधात भूमिका घेणार नाहीत असे दिसते. पक्षाच्या विरोधात गेल्यानंतर मंडलिक आणि मुश्रीफ एकत्र राहिले तर त्यातून घाटगे यांना कोणताच फायदा नाही. त्यामुळे ‘थांबा व पाहा’ अशीच त्यांची सध्याची भूमिका.
शिवाजीरावांचे पक्षकार्य राहणार सुरूच
शिवाजी पाटील यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी अक्कलकोटला आल्याचे सांगितले. ते म्हणाले, काहीही बदल घडले असले तरी माझ्या पक्षाचे काम तालुक्यात करू नको असे मला कोणीच म्हणणार नाही. त्यामुळे मी चंदगड तालुक्यात पक्षकार्य करतच राहणार.