भाजपमध्ये या... अन्यथा कुठेच जाऊ नका
By admin | Published: April 19, 2016 10:50 PM2016-04-19T22:50:33+5:302016-04-20T01:17:05+5:30
अशोकअण्णांना हाळवणकरांचा सल्ला : आजरा सूतगिरणीच्या गारमेंट प्रकल्पाचे उद्घाटन
आजरा : आजरा सूतगिरणी ही स्व. काशिनाथअण्णा चराटी व स्व. माधवराव देशपांडे यांच्या दूरदृष्टीने भक्कम आर्थिक पायावर उभी असून, १00 वर्षे चांगल्या पद्धतीने चाललेल्या या संस्था समूहाचे प्रमुख अशोकअण्णा चराटी यांनी भाजपमध्ये यावे. आम्ही सर्व ताकद पुरवू, अन्यथा कोठेच जाऊ नये, असा सल्ला आमदार सुरेश हाळवणकर यांनी दिला.आजरा सूतगिरणीच्या गारमेंट प्रकल्पाचा प्रारंभ व सूतगिरणीच्या नूतन मशिनरींच्या उद्घाटनप्रसंगी आमदार हाळवणकर बोलत होते. अध्यक्षस्थानी श्रीपतराव देसाई होते.यावेळी हाळवणकर म्हणाले, वस्त्र ही प्रमुख मूलभूत गरज असल्याने वस्त्रोद्योग चालले पाहिजेत; परंतु महाराष्ट्रातील अनेक सूतगिरण्यांवर संचालकांनीच दरोडा घातल्याने अनेक सूतगिरण्या अडचणीत आल्या आहेत. अशावेळी आजरा सूतगिरणीची वाटचाल कौतुकास्पद आहे. सूत उद्योगास केंद्र व राज्य सरकारच्या अनेक योजना आहेत. त्यांचा लाभ उठवावा. ‘कॉमन फॅसिलिटी सेंटर’सारखे उपक्रम राबवावेत. सूतगिरणीच्या माध्यमातून तालुक्यातील बचत गटांच्या महिलांनाही चांगला रोजगार उपलब्ध होऊ शकतो, असेही सांगितले.आमदार प्रकाश आबिटकर म्हणाले, जागेपणी स्वप्ने पाहून ती पूर्तीस नेणाऱ्या स्व. काशिनाथअण्णा व स्व. माधवराव देशपांडे यांनी अत्यंत खडतर अशा परिस्थितीत सूतगिरणीची उभारणीच केली नाही, तर ती उत्कृष्ट पद्धतीने चालवून सूतगिरणी चळवळीला दिशा देण्याचे काम केले आहे.
अशोकअण्णा चराटी म्हणाले, महाराष्ट्रातील उत्कृष्ट दहा सूतगिरण्यांमध्ये आजरा सूतगिरणीचा समावेश आहे; परंतु सूतगिरण्या अनंत अडचणीतून वाटचाल करीत आहेत. शासनाने वीज दर कमी करून सूतगिरण्यांना दिलासा देण्याची गरज आहे. गारमेंटच्या माध्यमातून ४०० महिलांना रोजगार देण्याचा आपला प्रयत्न आहे, असेही स्पष्ट केले.
अमोल वाघ यांनी स्वागत, रजनिकांत नाईक यांनी आभार, तर सचिन सटाळे यांनी सूत्रसंचालन केले. उद्योजक बापूसाहेब सरदेसाई, सी. डी. काणे, अध्यक्षा अन्नपूर्णादेवी चराटी, उपाध्यक्ष डॉ. अनिल देशपांडे, बाबूराव कुंभार, अरुण देसाई, बापू टोपले, मलिककुमार बुरूड, राजू जाधव, प्रकाश कोंडुसकर, दिगंबर देसाई, दशरथ अमृते, संभाजी पाटील, संजयभाऊ सावंत, एन. डी. केसरकर उपस्थित होते. (प्रतिनिधी)
मार्गदर्शन करा...
कारखाना ताब्यात घेतो..!
आजरा साखर कारखाना निवडणुकीत आपण मार्गदर्शन केल्यास कारखाना ताब्यात घेतल्याशिवाय राहत नाही, असे अशोकअण्णांनी जाहीररीत्या आमदार हाळवणकरांना सांगितले.
आजरा सूतगिरणीच्या गारमेंट प्रकल्पाचे उद्घाटन करताना आमदार सुरेश हाळवणकर. शेजारी आमदार प्रकाश आबिटकर, अशोकअण्णा चराटी, आदी उपस्थित होते.