भाजप सरकार शेतकरीविरोधी
By admin | Published: March 4, 2016 12:29 AM2016-03-04T00:29:11+5:302016-03-05T00:02:33+5:30
धान पिकांचे ३३ टक्के नुकसान झाले असल्यास नुकसान भरपाई देण्यात येईल, असे राज्य शासनाने घोषित केले होते.
साकोलीत धरणे आंदोलनात राकाँचा आरोप : दुष्काळनिधी शेतकऱ्यांना द्या
साकोली : धान पिकांचे ३३ टक्के नुकसान झाले असल्यास नुकसान भरपाई देण्यात येईल, असे राज्य शासनाने घोषित केले होते. पंरतु भंडारा जिल्ह्यात ६० ते ६२ पैसेवारी जाहीर केल्यामुळे ही गावे ३३ टक्के निकषात बसत असूनही शेतकऱ्यांना अद्याप मदत मिळाली नाही. केंद्र व राज्य शासन शेतकऱ्यांची दिशाभूल करीत असून हे सरकार शेतकरी विरोधी असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी केला.
साकोली, लाखनी व लाखांदूर तालुक्यातील रद्द झालेली दुष्काळग्रस्त निधी शेतकऱ्यांना देण्यात यावी, या मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे साकोली तहसील कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले. मुख्यमंत्र्यांना पाठविलेल्या निवदेनानुसार, खरीप हंगामात अपुऱ्या पावसामुळे साकोली लाखनी व लाखांदूर तालुक्यातील पिकांचे नुकसान झाले होते. धानाचे उत्पादनही कमी झाले. त्यानंतर राज्य शासनाने बाधीत शेतकऱ्यांसाठी दोन हजार कोटी रूपये वाटप करणार असल्याचे सांगितले होते. राज्यातील एकूण दुष्काळग्रस्त गावापैकी भंडारा जिल्ह्यातील ३७१ गावे पैसेवारीत दुष्काळग्रस्त घोषित करण्यात आले. या गावातील शेतकऱ्यांना शासन निर्देशानुसार दिलासा मिळेल, अशी आशा होती. असे असताना खरीप हंगामात अवर्षणामुळे बाधीत शेतकऱ्यांना नववर्षाच्या प्रारंभी शासनाने घोषित केलेल्या दुष्काळग्रस्त निधीतून भंडारा जिल्ह्याला वगळण्यात आले होते. परिणामी ५० पैशापेक्षा कमी पैसेवारी आलेल्या ३७१ गावातील शेतकरी मदतीविना राहणार आहेत.
शासकीय मदतीच्या आशेवर कर्ज फेडून शेती कसण्यााची भाबडी आशा बाळगणारे शेतकरी हवालदिल झाले आहे. कर्जात असलेल्या शेतकऱ्यांना पुन्हा एकदा सुलतानी संकटाला बळी पडावे लागणार आहे. हे टाळण्यासाठी शासनाने जाहीर केलेला निधी शेतकऱ्यांना देण्याची मागणी या आंदोलनात करण्यात आली. २९ फेब्रुवारीला झालेल्या अवकाळी वादळी पावसामुळे तालुक्यातील शेतातील धान, गहु व रबी पिकचे व विट भट्ट्याचे नुकसान झाले. त्याचे पंचनामे करून शासकीय मदत द्यावी, अशी मागणी करण्यात आली. या आंदोलनात राकाँचे जिल्हाध्यक्ष मधुकर कुकडे, प्रदेश महासचिव धनंजय दलाल, दामाजी खंडाईत, अविनाश ब्राम्हणकर, मदन रामटेके, प्रभाकर सपाटे, हेमकृष्ण वाडीभस्मे, नरेंद्र वाडीभस्मे, सदाशिव वलथरे, अंगराज समरीत, दीपक चिरवतकर, बालु चुन्ने, धनु व्यास, उर्मिला आगाशे, कैलास गेडाम, आशा हटवार, लता दुरूगकर, शिलादेवी वासनिक, उमेद गोडसे, राकेश भास्कर, शैलेश गजभिये यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते. (तालुका प्रतिनिधी)