"आमदारकीसाठी बारामतीचे उंबरे झिजवायला लागलात, यातूनच कर्तृत्वाची उंची दिसते"
By ऑनलाइन लोकमत | Published: July 15, 2020 07:01 PM2020-07-15T19:01:23+5:302020-07-15T19:03:04+5:30
जनतेने नाकारलेल्या माजी खासदार राजू शेट्टी यांना ती का झोंबली अशी संतप्त विचारणा बुधवारी भाजपाच्या पदाधिकाऱ्यांनी केली.
कोल्हापूर : भाजपचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांनी मुंबईतील धारावी परिसरातील राष्ट्रीय संघ स्वयंसेवकांनी केलेल्या कामाची माहिती दिली असताना जनतेने नाकारलेल्या माजी खासदार राजू शेट्टी यांना ती का झोंबली अशी संतप्त विचारणा बुधवारी भाजपाच्या पदाधिकाऱ्यांनी केली. जिल्हा उपाध्यक्ष नाथाजी पाटील, किसान मोर्चाचे जिल्हाध्यक्ष भगवान काटे,उपाध्यक्ष बाजीराव देसाई या त्यासंबंधीचे पत्रक प्रसिध्दीस दिले आहे.
वेबसाईटवर जावून संघ समाजासाठी काय काम करतो हे पाहावे व आपण पराभूत झाल्यानंतर समाजासाठी काय केले याची माहिती वेबसाईटवर द्यावी असे आव्हानही या पत्रकात त्यांना दिले आहे. राज्यपाल नियुक्त आमदारकीसाठी शेट्टी यांनी ताळतंत्र सोडल्याचा पलटवार करण्यात आला आहे.
पत्रकात म्हटले आहे, शेट्टी यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने राज्यभर काम करावे अशी उपहासात्मक टीका केली. देशामध्ये ज्या-ज्यावेळी संकटे आली तेव्हा संघाचे स्वयंसेवक कोणत्याही प्रसिद्धीची अपेक्षा न ठेवता झोकून देऊन काम करतात. संघ स्वयंसेवकांनी राज्यभर काम करावे, नागपूर मुख्यालयात काम करावे असे उपदेशाचे डोस पाजण्यापेक्षा आपण कोरोना महामारीच्या काळात काय काम केले हे एकदा स्पष्ट करावे. शेतकऱ्यांचे नेतृत्व करण्याचे ढोंग करून त्यांना फसवत आलात व आता तर राज्यपाल नियुक्त आमदारकीसाठी बारामतीचे उंबरे झिजवायला लागलात यातूनच कर्तृत्वाची उंची दिसते.
सत्तेतील पदाशिवाय तुम्ही जगू शकत नाही हेच त्यातून सिद्ध होते. ज्या महाविकास आघाडीचे गोडवे गाताना थकत नाही त्या आघाडीच्या मुख्यमंत्र्यांना सांगून वीज बिले माफ करावीत. प्रसिद्धीसाठी वीज बिलांची होळी करून हा प्रश्न सुटणार नाही. सामान्य जनतेच्या अनेक प्रश्नाची उत्तरे प्रलंबित असताना व महाराष्ट्रातील सत्ताधीशांनी जनतेला वाऱ्यावर सोडले असताना फक्त स्वत:च्या आमदारकीसाठी आपण संघावर टीका करणे बंद करावे, असं सांगण्यात आलं आहे.