जिंकण्यासाठी काहीही.. भाजप आक्रमक वळणावर; लोकसभेतील अपयश पुसण्यासाठी कसली कंबर

By समीर देशपांडे | Published: September 27, 2024 12:54 PM2024-09-27T12:54:37+5:302024-09-27T12:55:24+5:30

फोडाफोडीची जाहीर परवानगी

BJP is aggressive to win in Maharashtra assembly elections | जिंकण्यासाठी काहीही.. भाजप आक्रमक वळणावर; लोकसभेतील अपयश पुसण्यासाठी कसली कंबर

जिंकण्यासाठी काहीही.. भाजप आक्रमक वळणावर; लोकसभेतील अपयश पुसण्यासाठी कसली कंबर

समीर देशपांडे

कोल्हापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कधी नव्हे इतक्या सभा महाराष्ट्रात घेतल्या. भाजप, शिंदेसेना आणि अजित पवार यांनी ताकद लावली. तरीही लोकसभेला झालेला पराभव भाजपला किती आणि कसा जिव्हारी लागला आहे हे अमित शाह यांच्या भाषणामधून बुधवारी उमगले. त्यामुळेच विधानसभेच्या निवडणुकीमध्ये ‘जिंकण्यासाठी काहीही’ अशी भूमिका घेत वातावरण ढवळून काढण्यास भाजपने सुरुवात केली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर फार अवलंबून रहावे लागू नये यासाठीच भाजपने ही रणनीती आखल्याचे मानले जाते.

राज्यात अधिकाधिक जागा पदरात पाडून घेत त्यातील बहुतांशी जागा निवडून आणण्यासाठी ही रणनीती आहे. याचाच एक भाग म्हणून शाह यांचे हे मेळावे होत आहे. लोकसभेला महाराष्ट्रात महायुती पिछाडीवर गेली ही वस्तुस्थिती आहे. भले कमी मतात काही जागा गेल्या असल्यातरी हा पराभवच आहे, हे मान्यच करावे लागेल. त्यामुळे कार्यकर्ते नाराज झाले. शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांना अशीच सहानुभूती मिळणार असेल तर काय करायचे, असा प्रश्न त्यांच्या मनात घोळत होता. अशातच महायुतीमधील अनेक नेत्यांची मुक्ताफळे ऐकल्यानंतर अनेकवेळा संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले. अशा स्थितीत आता महाराष्ट्रातील नेत्यांनी काही सांगून फरक पडेल असे वाटत नव्हते. त्यामुळेच ही जबाबदारी शाह यांनी घेतली.

त्यांनी राज्यातील आपल्या भाषणांची सुरुवात कार्यकर्त्यांच्या नाराजीला हात घालून केली. आतापर्यंत जे धाडसी निर्णय घेतले गेले नाहीत ते नरेंद्र मोदी यांनी घेतले. ३७० कलम रद्दपासून, चांद्रयानापर्यंतची उदाहरणे दिली. नक्षलवाद संपवला, शिक्षणाचे धोरण बदलले आणि हे केवळ भाजपमुळे शक्य झाल्याचे सांगत निराशा झटकण्याचे आवाहन केले. २०२९ ला भारताची अर्थव्यवस्था जगात तिसरी असेल हे सांगायला ते विसरले नाहीत. त्यांनी जाता जाता धनुष्यबाण आणि घड्याळाचा उल्लेख केला. परंतु त्यांचा भर राहिला तो कमळ फुलवण्यावरच.

फोडाफोडीची जाहीर परवानगी

एकीकडे संत, महंतांच्या भेटी घ्या, त्यांचा सत्कार करा, आशीर्वाद घ्या असे सांगणाऱ्या शाह यांनी विरोधी पक्षाच्या कार्यकर्त्यांना फोडण्याची जाहीर परवानगी देत आपला इरादा स्पष्ट केला आहे. शासकीय योजनांच्या सर्व लाभार्थ्यांच्या घरी चहा पिऊन या आणि मतदानादिवशी सकाळी ११ पर्यंत आपल्या घरातील आणि शेजारच्या चार घरातील मतदान करून घेण्यास बजावले आहे. त्यांनी हा दिलेला सगळा कार्यक्रम म्हणजे महाराष्ट्रात लहान भावांना मागे सोडून आपण एकटेच सुसाट पुढे जायचे असे धोरण दिसते.

कार्यकर्ते रिचार्ज पण..

शाह यांच्या या भाषणाने कार्यकर्ते रिचार्ज झाल्याचे वातावरण त्यावेळी दिसले. परंतु मतदानाला अजून पावणे दाेन महिने आहेत. त्यामुळे मिळणाऱ्या जागा, बंडखोरी, मित्रपक्षांची भूमिका या सगळ्यात या कार्यकर्त्यांची बॅटरी किती चार्ज राहणार ते पाहणे औत्सुक्याचे आहे.

Web Title: BJP is aggressive to win in Maharashtra assembly elections

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.