भाजपचा संबंध नाही, मग भिंडेवर कारवाई का नाही?, सतेज पाटील यांची राज्य सरकारला विचारणा
By ऑनलाइन लोकमत | Published: August 1, 2023 02:01 PM2023-08-01T14:01:22+5:302023-08-01T14:02:18+5:30
चांदोलीसारख्या धरणाची अतिरेकी रेकी करून गेले. याबाबत एटीएस, गुप्तचर यंत्रणेलाही कळली नाही. ही बाब राज्याच्या दृष्टीने योग्य नाही.
कोल्हापूर : भिडे गुरुजींचे वादग्रस्त वक्तव्य आणि सरकार त्यांना पाठीशी घालत आहे. आमचा त्यांच्याशी काही संबंध नाही, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह सारा भाजप सांगत आहे. मग त्यांच्यावर सरकार कायदेशीर कारवाई का करीत नाही, अशी विचारणा काँग्रेसचे आमदार व विधान परिषदेतील गटनेते सतेज पाटील यांनी सोमवारी येथे पत्रकारांशी बोलताना केली.
चांदोलीसारख्या धरणाची अतिरेकी रेकी करून गेले. याबाबत एटीएस, गुप्तचर यंत्रणेलाही कळली नाही. ही बाब राज्याच्या दृष्टीने योग्य नाही. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना देणे ही बाब मूळ प्रश्नांना बगल देण्यासाठीच केली आहे. सर्वांचे लक्ष विचलित करण्यासाठीच हा प्रकार केला आहे. ही बाब गंभीर आहे. या सर्वांचा जाब विधिमंडळात सरकारला द्यावा लागेल, असे त्यांनी स्पष्ट केले.
पालकमंत्री दीपक केसरकर यांनी राधानगरी धरणाचे दरवाजांबाबत शिर्डीत प्रार्थना केली म्हणून एक फुटानेसुद्धा पाणीपातळी वाढली नाही. असे वक्तव्यावर त्यांनी इतकी अंधश्रद्धा असू नये, हे दुर्दैवी असल्याचे मत व्यक्त केले.
केसीआर यांचा विषय निवडणुकीनंतर संपून जाईल..
तेलंगणा मुख्यमंत्री के. चंद्रशेखरराव यांचा कोल्हापूर नव्हे तर पश्चिम महाराष्ट्रात काय संबंध आहे..? त्यांच्या जाहिराती येथे करण्याचे कारण काय आहे. त्यांच्या राज्यात काय चाललंय ते पाहावे. हा सरकारी पैशाचा अपव्ययच आहे. सरकारी पैशावर त्यांनी महाराष्ट्रासह संपूर्ण देशभर तेलंगणामधील केलेल्या कामाच्या जाहिराती केल्या आहेत. हा सर्व प्रकार भाजपाप्रेरित आहे. त्यांना राज्यात लोकांचा प्रतिसाद नाही. तेलंगणाच्या निवडणुकीनंतर त्यांचा विषय संपून जाईल.