भाजप कोल्हापूर ग्रामीणचे जिल्हाध्यक्ष राहुल देसाईंनी दिला राजीनामा
By ऑनलाइन लोकमत | Published: August 21, 2024 03:22 PM2024-08-21T15:22:03+5:302024-08-21T15:22:45+5:30
शिवाजी सावंत गारगोटी: भाजपाचे ग्रामीणचे जिल्हाध्यक्ष राहुल देसाई यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. देसाईंच्या राजीनाम्याने राधानगरी विधानसभा मतदारसंघात ...
शिवाजी सावंत
गारगोटी: भाजपाचे ग्रामीणचे जिल्हाध्यक्ष राहुल देसाई यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. देसाईंच्या राजीनाम्याने राधानगरी विधानसभा मतदारसंघात खळबळ उडाली. दोन्ही जिल्हाध्यक्षांनी एकदम राजीनामा देण्याची पहिलीच वेळ आहे. राष्ट्रवादीच्या तुतारीने कोल्हापूर जिल्ह्यात पक्षांतर करण्याचे जणू रणशिंग फुंकले आहे.
आगामी विधानसभा निवडणुकीत महायुतीमुळे देसाई यांना उमेदवारी मिळणार नसल्याचे चित्र स्पष्ट होते. त्यामुळे त्यांची घुसमट होणार होती. अपक्ष लढावे लागणार असल्याने त्यांनी हे पाऊल उचलले असावे. कार्यकर्त्यांच्या बैठकीत ते राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट), काँग्रेस, शिवसेना (उध्दव ठाकरे) यापैकी कोणत्या पक्षात प्रवेश करणार याचा निर्णय घेणार आहेत. मात्र, आमदार सतेज पाटील यांच्याशी त्यांच्या घराण्याचे जूने संबंध, घराण्यातील दोन पिढ्यांचा काँग्रेस पक्षासोबत आहेत. विधानसभा निवडणुकीत उमेदवारीचा शब्द घेऊन ते भविष्यातील त्यांची राजकीय वाटचाल महाआघाडीच्या बाजुने रहाणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
पाच वर्षांपूर्वी माजी महसूलमंत्री आमदार चंद्रकांत पाटील यांच्या माध्यमातून त्यांनी भाजपामध्ये प्रवेश केला होता. मात्र सत्तेचा कोणताही लाभ त्यांना मिळाला नसल्यामुळे त्यांच्या कार्यकर्त्यांच्यामध्ये असंतोष पसरला होता. त्यामुळे भाजपा सोडण्यासाठी त्यांच्यावर कार्यकर्त्यांनी दबाव वाढवला होता. त्यांचा या विधानसभा मतदारसंघात स्वतंत्र गट असल्याने ते विधानसभा निवडणूक लढविण्यासाठी सज्ज आहेत.
आमदार सतेज पाटील यांच्या जोडणीच्या माध्यमातून मागील निवडणुकीत झालेल्या पराभवाचा वचपा काढण्यासाठी ते पुन्हा काँग्रेसच्या वाटेवर जाण्याची शक्यता आहे. मात्र, ए वाय पाटील हे लोकसभेच्या निवडणुकीत अगोदरच त्या ठिकाणी गेले असल्याने उमेदवारीसाठी अडचणी वाढणार आहेत. पण कार्यकर्ते आणि जिल्ह्याच्या नेत्यांशी चर्चा करून पक्ष प्रवेश करण्यावर ते ठाम आहेत. अत्यंत मनमिळावू आणि शांत स्वभावामुळे त्यांची राजकारणात वेगळी ओळख आहे.