भाजप नव्याने टोल लादतंय : अजित पवार
By Admin | Published: February 2, 2015 11:39 PM2015-02-02T23:39:11+5:302015-02-02T23:41:01+5:30
केवळ लेटरपॅडसाठी शाखा न उघडता प्रत्यक्षात काम करावे. अपयशाने खचून न जाता पुन्हा नव्याने जोमाला लागावे. केंद्र सरकारने अनेक पॅकेजची घोषणा केली.
कोल्हापूर : विधानसभा निवडणुकीच्यावेळी टोलमुक्त महाराष्ट्र करू, असे आश्वासन देत भाजप सत्तेवर आले. मात्र, तेच आता जनतेची दिशाभूल करत नव्याने टोल लादत आहे, असा आरोप राष्ट्रवादीचे नेते माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले.
शहर, जिल्हा राष्ट्रवादीतर्फे येथील शाहू सांस्कृतिक मंदिरातील कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात आज, सोमवारी ते बोलत होते. खासदार धनंजय महाडिक, आमदार हसन मुश्रीफ यांची प्रमुख उपस्थिती होती. पवार म्हणाले, भाजपची भूमिका दुटप्पी आहे. कोल्हापूरच्या टोलप्रश्नी समिती नेमून चोथा केला आहे. समितीच्या पुढे काहीही निर्णय होत नाही. राज्यात कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न वारंवार निर्माण होत आहे. शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढल्या आहेत.राष्ट्रवादी सरकारला बाहेरून पाठिंबा देणार, असे जाहीर केल्यानंतर कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला. भाजप आणि शिवसेना जातीयवादी पक्ष आहेत. त्यांच्याबरोबर आम्ही जाणार नाही. प्रतिकूल परिस्थितीमध्ये ेकार्यकर्त्यांनी सतर्कपणे पक्षबांधणीसाठी योगदान द्यावे. शासनाच्या चुकीच्या धोरणांविरोधात रस्त्यावर उतरून आंदोलन करावे. केवळ लेटरपॅडसाठी शाखा न उघडता प्रत्यक्षात काम करावे. अपयशाने खचून न जाता पुन्हा नव्याने जोमाला लागावे. केंद्र सरकारने अनेक पॅकेजची घोषणा केली. मात्र, प्रत्यक्षात अद्याप पैसे मिळालेले नाहीत.
खासदार धनंजय महाडिक हे सर्व घटकांसाठी विविध उपक्रम राबवत आहेत. महाडिक यांनी केवळ शहरापुरतेच न राहता सर्व तालुक्यांत पक्षसंघटना मजबूत करावी. शिधापत्रिकेवरील रेशन बंद केल्याच्या विरोधात ३ फेब्रुवारीला आंदोलन करण्यात येईल. दुसऱ्या टप्प्यात जिल्ह्णातील प्रत्येक तालुक्यातील कार्यकर्त्यांशी संपर्क साधणार आहे.
नाव न घेता शेट्टींवर टीकास्त्र
.बारामती, कराड, इंदापूर येथे जाऊन आंदोलन करणारे खासदार आता ‘बघ्याची भूमिका’ घेत आहेत, असा नामोल्लेख टाळत खासदार राजू शेट्टी यांच्यावर पवार यांनी टीकास्र सोडले. एफआरपी न देणाऱ्यांवर कारवाईची धमकी देण्याशिवाय काहीही झालेले नाही. भाजपच्याही नेत्यांचे कारखाने आहेत. त्या कारखान्यांनीही एफआरपीची रक्कम अजून दिलेली नाही. कारवाईचा इशारा देऊन काहीही होत नाही, असे पवार म्हणाले.