आश्वासनांची वचनपूर्ती... चंद्रकांत पाटलांकडून शहीद जवानांच्या कुटुंबीयांना मदत
By ऑनलाइन लोकमत | Published: January 27, 2021 07:54 PM2021-01-27T19:54:06+5:302021-01-27T19:54:46+5:30
Chandrakant Patil : शहीद संग्राम पाटील आणि शहीद ऋषिकेश जोंधळे यांच्या कुटुंबीयांना भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मदत केली आहे.
मुंबई : देशाच्या संरक्षणासाठी गेल्या काही दिवसांपूर्वी आपल्या प्राणांची आहुती देणारे कोल्हापूर जिल्ह्यातील शहीद संग्राम पाटील आणि शहीद ऋषिकेश जोंधळे यांच्या कुटुंबीयांना भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मदत केली आहे. चंद्रकांत पाटील यांनी शहीद संग्राम पाटील यांच्या दोन्ही मुलांच्या शिक्षणासाठी निधी उपलब्ध करुन दिला आहे. तर शहीद ऋषिकेश जोंधळे यांच्या कुटुंबीयांसाठी स्वतःच्या हक्काच्या घरासाठी मदत केली आहे.
कोल्हापूर जिल्ह्यातील करवीर तालुक्यातील निगवे खालसा गावचे सुपुत्र संग्राम पाटील आणि आजरा तालुक्यातल्या बहिरे गावचे सुपुत्र हृषिकेश जोंधळे यांना सीमेवर देशाचे रक्षण करताना वीरमरण आले. संग्राम पाटील यांना दोन मुले असून, माध्यमिक शाळेत शिक्षण घेत आहेत. संग्राम पाटील यांच्या मुलांच्या शिक्षणासाठी सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन चंद्रकांत पाटील यांनी दिले होते.
त्याची पूर्तता म्हणून शहीद संग्राम पाटील यांच्या दोन्ही मुलांच्या शिक्षणासाठी प्रत्येकी अडीच-अडीच लाखांची मदत व शहीद ऋषिकेश जोंधळे यांच्या परिवारास घरासाठी निधी उपलब्ध करून देत आपल्या आश्वासनांची वचनपूर्ती केली.माजी आमदार@Amal_Mahadik यांच्या मार्फत आज ही मदत सुपूर्द करण्यात आली.
— Chandrakant Patil (@ChDadaPatil) January 27, 2021
तर हृषिकेश जोंधळे यांचे कुटुंबीय भाड्याच्या घरात राहतात. त्यामुळे हृषिकेश जोंधळे यांच्या कुटुंबीयांना पक्क घर बांधून देण्याचा शब्द चंद्रकांत पाटील यांनी दिला होता. त्यानुसार प्रजासत्ताक दिनी दोन्ही कुटुंबीयांना मदत करत चंद्रकांत पाटील यांनी आपल्या आश्वासनांची पूर्तता केली आहे.
काल प्रजासत्ताक दिनी संग्राम पाटील यांच्या दोन्ही मुलांच्या शिक्षणासाठी अडीच-अडीच लाखांच्या निधी संवेदना फाऊंडेशनच्या माध्यमातून देण्यात आला. तर हृषिकेश जोंधळे कुटुंबाला घरासाठी निधी उपलब्ध करून दिला. हा निधी माजी आमदार अमल महाडिक यांच्यामार्फत दोन्ही कुटुंबीयांना सुपूर्द करण्यात आला.