लोकसभेचं राजकारण: भाजप नेते सुरेश हाळवणकर झाले प्रभारी, सक्रिय राजकारणातून बाजूला
By ऑनलाइन लोकमत | Published: June 20, 2022 01:43 PM2022-06-20T13:43:43+5:302022-06-20T13:44:46+5:30
हाळवणकर यांचा राजकीय बेस हातकणंगले मतदार संघात आहे. तसे असताना कदाचित भविष्यात हाळवणकर-आवाडे संघर्ष होवू नये यासाठीच त्यांना कोल्हापूरची जबाबदारी दिली असावी अशीही चर्चा आहे.
विश्वास पाटील
कोल्हापूर : भाजपचे जिल्ह्यातील निष्ठावंत नेते, माजी आमदार सुरेश हाळवणकर यांना पक्षाने लोकसभेचे प्रभारी म्हणून सन्मानाची जबाबदारी जरुर दिली असली तरी त्यांना सक्रिय राजकारणातून बाजूला करण्याचा हा डाव आहे की काय अशी शंका शुक्रवारी उपस्थित झाली. कोल्हापूरचे प्रभारी केल्याने ते हातकणंगले लोकसभा मतदार संघातून निवडणूक लढवू शकणार नाहीत हे स्पष्टच आहे.
दुसरे महत्वाचे की इचलकरंजी विधानसभा मतदार संघात आता आमदार प्रकाश आवाडे यांनी भाजपला पाठिंबा दिल्याने विधानसभेलाही हाळवणकर यांना पुन्हा संधी मिळण्याची शक्यता धूसर आहे. कोल्हापूर, हातकणंगले हे दोन्ही मतदार संघ लोकसभेसाठी भाजपच्या रडारवर आहेत. हे मतदार संघ अस्तित्वात आल्यापासून भाजपला ते जिंकता आलेले नाहीत.
ज्यांना सक्रिय राजकारणातून बाजूला करायचे असते त्यांना भाजपमध्ये पक्षसंघटनेतील गोंडस नावांची पदे देण्याची पध्दत आहे. कधीही संघटना राजकीय सत्तेपेक्षा मोठी असते असाहा मुलामा त्यास दिला जातो. तसेच हाळवणकर यांच्या बाबतीत घडले आहे. पक्षाच्या मार्गदर्शन मंडळात त्यांची वर्णी लागली आहे.
हातकणंगले लोकसभेला पक्षाकडून राहुल आवाडे यांना उमेदवारी द्यावी अशी मागणी आमदार प्रकाश आवाडे यांनीच प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्याकडे केली आहे. आजच्या घडीला या मतदार संघातून लढण्यासाठी राहुल यांच्याशिवाय दुसरा तगडा उमेदवार भाजपकडे नाही. माजी खासदार राजू शेट्टी जिल्ह्याच्या राजकारणात महाविकास आघाडीच्या विरोधात आहेत. त्यामुळे कदाचित भाजप त्यांना यापूर्वी दिला तसा बाहेरून पाठिंबा देणार का अशीही चर्चा सुरू होती परंतू त्यांची एकला चलो रे ची भूमिका आहे. त्यामुळे शिवसेनेचे खासदार धैर्यशील माने, भाजपचे राहुल आवाडे व स्वाभिमानीकडून शेट्टी अशी तिरंगी लढत या मतदार संघात होईल असे चित्र आताच दिसत आहे.
अशीही मेख..
हाळवणकर यांच्याकडे कोल्हापूरची व आमदार गोपीचंद पडळकर यांच्याकडे हातकणंगले मतदार संघाची जबाबदारी दिली आहे. हाळवणकर यांचा राजकीय बेस हातकणंगले मतदार संघात आहे. तसे असताना कदाचित भविष्यात हाळवणकर-आवाडे संघर्ष होवू नये यासाठीच त्यांना कोल्हापूरची जबाबदारी दिली असावी अशीही चर्चा आहे. कोल्हापूर मतदार संघासाठी नाथाजी पाटील संयोजक तर हातकणंगलेसाठी जयसिंगपूरचे विठ्ठल पाटील संयोजक आहेत.
आम्हीच प्रबळ दावेदार..
कुणाला उमेदवारी द्यायचे हे ठरविण्याची जबाबदारी आता आमच्याकडे आली आहे. त्यामुळे प्रभारी झालो तरी सक्रिय राजकारणातून बाजूला झालो असे म्हणता येत नाही. विधानसभा निवडणूकीचे हाळणकर हे प्रबळ दावेदार आहेत. हाळवणकर यांचा पक्षात दबदबा असल्यानेच आवाडे यांचा भाजपमधील थेट प्रवेश अजून झाला नसल्याचे त्यांच्या समर्थकांना वाटते.
अशी आहे मोर्चेबांधणी....
कोल्हापूर लोकसभा मतदार संघात २०५४ तर हातकणंगलेमध्ये १९५६ मतदान केंद्रे (बूथ) आहेत. एक बूथ एक हजार मतदारांचा असतो. असे ५ बूथ एकत्र करून एक शक्ती केंद्र केले जाते. प्रत्येक केंद्रात एकूण मतदार किती, त्यातील जातनिहाय मतदार,त्यातील केंद्र शासनाच्या योजनांचे लाभार्थी किती, त्यांच्या पर्यंत कसे पोहाचायचे अशी ही रचना आहे. लोकसभेला अजून दोन वर्षाचा अवधी असला तरी भाजपकडून निवडणुकीचे काम सुरू झाले आहे. त्यासाठी महाराष्ट्रातील पहिल्या टप्प्यात १६ मतदार संघ निवडण्यात आले असून त्याची जबाबदारी माजी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे दिली आहे. देशातील १४४ मतदार संघावर लक्ष केंद्रित केले असून केंद्रीय समन्वयक म्हणून विनोद तावडे हे काम पाहणार आहेत.