“…निकालानंतर तोंडाला पाणी सुटलं आणि शरद पवारांच्या आश्रयात गेले;” अमित शाहंचा उद्धव ठाकरेंना टोला
By ऑनलाइन लोकमत | Published: February 19, 2023 09:20 PM2023-02-19T21:20:29+5:302023-02-19T21:26:23+5:30
आज वेळ बदलली आहे आणि खरी शिवसेना धनुष्यबाणासह भाजपसह आहे, असं अमित शाह म्हणाले.
कोल्हापूर: येत्या लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रातील सर्वच्या सर्व लोकसभेच्या ४८ जागा भाजप, शिवसेना आणि मित्र पक्षांच्या निवडून द्या आणि महाराष्ट्रात भाजप शिवसेनेचे वर्चस्व निर्माण करा, असं स्पष्ट आवाहन केंद्रीय गृहमंत्री व भाजप नेते अमित शाह यांनी केलं. दरम्यान, यावेळी अमित शाह यांनी उद्धव ठाकरेंवर जोरदार निशाणा साधला. “निवडणुकाचे निकाल आले आणि नंतर त्यांच्या तोंडाला पाणी सुटलं. सर्व तत्त्वांना त्यांनी बाजूला ठेवले आणि शरद पवारांच्या आश्रयात जाऊन मला मुख्यमंत्री बनवा म्हणाले,” असं म्हणत शाह यांनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला.
“आपल्याला निवडणुकांमध्ये जिंकायचं आहे. आता सर्व समस्या दूर झाल्या आहेत. २०१९ ला देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली लढलो होतो. त्यावेळी मोदींचा मोठा फोटो लावला होता आणि लहान फोटो उद्धव ठाकरेंचा लावला होता की नाही? जेव्हा निवडणुकांचे निकाल आले तेव्हा तोंडाला पाणी सुटलं. सर्व तत्त्वांना बाजूला ठेवून शरद पवारांच्या आश्रयात गेले. त्यांना सांगितलं मला मुख्यमंत्री बनवा. मोठा पक्ष कोणता होता? कोण मुख्यमंत्री बनायला हवं होतं? आम्हाला सत्तेचा लोभ नाही, सत्तेसाठी आम्ही आमची तत्त्व बाजूला ठेवली नाहीत,” असं अमित शाह म्हणाले.
आज वेळ बदलली आहे...
“हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा पक्ष आज शरद पवारांच्या चरणात बसला होता. पण आज वेळ बदलली आहे आणि खरी शिवसेना धनुष्यबाणासह भाजपसह आहे,” असं त्यांनी नमूद केलं. मी पुन्हा सांगतो आमच्या मनात सत्तेचा मोह नाही. महाराष्ट्राचं हित सर्वतोपरी आहे. आजही एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री बनवण्याचं काम भाजपच्या आमदारांनी केलं. महाराष्ट्रात निवडणुका असताना आमची अपेक्षा महाराष्ट्रात बहुमताची नाही. आम्ही संतुष्ट नाही. यावेळी संपूर्ण विजय हवा आहे. ४८ पैकी ४८ जागा आम्हाला हव्या असल्याचंही शाह यांनी स्पष्ट केलं.
In the land of Rajarshi Shahu Ji Maharaj, Kolhapur, addressing 'Vijay Sankalp Rally' organised by Maharashtra BJP .
— Amit Shah (@AmitShah) February 19, 2023
राजर्षी शाहूजी महाराजांची भूमी असलेल्या कोल्हापुरात @BJP4Maharashtra च्या 'विजय संकल्प रॅली'ला संबोधित करणार आहे.
https://t.co/mx5txsYWOx
“शिवसेना भाजप युती पुन्हा एकदा हे सिद्ध करेल की कुटील बुद्धीनं राजकारणाला सत्तेला काही काळासाठी मिळवू शकता. पण मैदानात येण्याचा येण्याची वेळ येते तेव्हा साहस, शौर्य, परिणाम आवश्यक आहे. तो तुमच्या भाजपच्या कार्यकर्त्यांकडे आहे,” असंही त्यांनी म्हटलं.