भाजपच्या नेत्याला आठवले महात्मा फुलेंऐवजी निळू फुले, व्हिडीओ व्हायरल
By विश्वास पाटील | Published: April 5, 2023 01:49 PM2023-04-05T13:49:07+5:302023-04-05T13:53:31+5:30
व्हिडीओ व्हायरल झाल्यामुळे गंमतीदार प्रतिक्रिया उमटल्या
कोल्हापूर : चंदगड तालुक्यातील एका कार्यक्रमात भाजपचे विधानसभेचे संभाव्य उमेदवार शिवाजीराव पाटील यांनी महापुरुषांचा उल्लेख करत असताना महात्मा फुलेंऐवजी चक्क निळू फुलेंचे नाव घेतल्याचा व्हिडीओ व्हायरल झाल्यामुळे नेत्याला जर महापुरुषांविषयी माहिती नसेल तर लोकप्रतिनिधी होण्याची स्वप्ने कशी पडतात, असा सवाल उपस्थित केला जात आहे.
छत्रपती शाहू महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा जोतिबा फुलेही आपली दैवते असून त्यांच्याविषयी आदर असणे गरजेचे आहे. त्यांच्याविषयी आत्मियता असणे गरजेची आहे. मात्र, नुकताच वाळकुळी-केरवडे (ता. चंदगड) येथे जलजीवन योजनेचा व रस्त्याचे उद्घाटन थाटामाटात झाले.
या कार्यक्रमात भाजपचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य शिवाजीराव पाटील म्हणाले, महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांना मानाचा मुजरा करून तसेच शाहू, निळू फुले, आंबेडकर यांना मानमुजरा करून..भाषणास उभा आहे..महापुरुषांचा उल्लेख करताना शाहू, फुले, आंबेडकरांऐवजी चक्क निळू फुले यांचे नाव घेतल्याचा व्हिडीओ व्हायरल झाल्यामुळे त्याची जोरदार चर्चा सुरू आहे. त्यावर फारच गंमतीदार प्रतिक्रिया उमटल्या आहेत.
पाटील यांनी विधानसभेची गेली निवडणूक भाजपच्याच छुप्या पाठिंब्यावर परंतु अपक्ष लढवली. आगामी निवडणुकीत ते भाजपचे संभाव्य उमेदवार आहेत. त्यांना महात्मा फुले आणि निळू फुले यांच्यातील फरक कळत नाही आणि म्हणे त्यांना आमदारकीची स्वप्ने पडू लागलेत, अशाही प्रतिक्रिया सोशल मीडियावर उमटल्या आहेत. अवघ्या २२ सेकंदाचा हा व्हिडीओ सगळीकडे शेअर होत आहे.
कोल्हापूर- भाजपच्या नेत्याला आठवले महात्मा फुलेंऐवजी निळू फुले, व्हिडीओ व्हायरलhttps://t.co/CbvSFUB0GJpic.twitter.com/HFeyasvEpn
— Lokmat (@lokmat) April 5, 2023