फुकटचे श्रेय घेण्यासाठी आदल्या दिवशी उद्घाटने करणारे ते तर घुसखोरच, समरजित घाटगेंचा मुश्रीफांवर पलटवार
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2023 16:55 IST2023-02-07T16:35:43+5:302023-02-07T16:55:41+5:30
मला जे करायचे ते छातीठोकपणे करतो

फुकटचे श्रेय घेण्यासाठी आदल्या दिवशी उद्घाटने करणारे ते तर घुसखोरच, समरजित घाटगेंचा मुश्रीफांवर पलटवार
दत्ता पाटील
म्हाकवे : कागलमधील कामांची उद्घाटने आम्ही कार्यक्रमाच्या पत्रिका काढून सन्मानपूर्वक करत आहोत. माञ, चोर ते चोर आणि वर शिरजोर बनलेले फुकटचे श्रेय घेण्यासाठी आदल्याच दिवशी घाईघाईने उदघाटन करत आहेत. त्यामुळे त्यांना घुसखोर हीच उपाधी द्यावी लागेल असा पलटवार भाजपाचे जिल्हाध्यक्ष समरजित घाटगे यांनी मुश्रीफांचे नाव न घेता केला.
म्हाकवे ता. कागल येथे जलजीवन मिशन योजनेतून चार कोटी ९४ लाख रुपये खर्चाच्या पाणी योजनेचा शुभारंभ, बांधकाम कामगारांना साहित्य वाटप व गुणवंतांचा सत्कार अशा संयुक्त कार्यक्रमप्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी गोकुळचे माजी चेअरमन रणजितसिंह पाटील होते.
मला जे करायचे ते छातीठोकपणे करतो. यापुढेही असे उद्घाटन कार्यक्रम आम्ही तारखा जाहीर करूनच करु. तुम्ही माञ आदल्या दिवशी उद्घाटन करून घुसखोरी करत राहा तुमच्या या घुसखोरीचा जनता करेक्ट बंदोबस्त करेल असा टोलाही घाटगे यांनी लगावला.
उपसरपंच धनंजय पाटील यांनी प्रास्ताविक केले. महावीर पाटील,रविंद्र पाटील यांनी मनोगत व्यक्त केले. शाहूचे उपाध्यक्ष अमरसिंह घोरपडे, पी.डी. चौगुले, ए.डी.पाटील, अजित पाटील, संदीप पाटील, संदीप कांबळे, प्रताप पाटील, दत्तामामा खराडे उपस्थित होते.
आता सांगा उद्घाटनचा अधिकार कोणाला?
येथील पाणी योजनेच्या दोन वेळा होणाऱ्या उद्घाटनावरुन उलटसुलट चर्चा सुरू आहे. त्या पार्श्वभूमीवर या योजनेला १२ आक्टोंबर २२ रोजी तांञिक तर १७ नोव्हेंबर २२ रोजी प्रशासकिय मान्यता आणि गत आठवड्यात वर्कऑर्डर मिळाली आहे. त्यामुळे या योजनेचे उद्घाटनाचा अधिकार कोणाला हे गावकऱ्यांनीच सांगावे असा खुलासा उपसरपंच धनंजय पाटील यांनी केला.
बॅनर लागला... निधीच काय
मुश्रीफसाहेबांनी काही महिन्यापूर्वीच म्हाकवे येथील वारकऱ्यांसाठी पंढरपूर मध्ये मठ बांधण्यासाठी 50 लाख रुपयांचा निधी देण्याचे जाहीर केले. याचा बॅनरही लागला. तसेच ग्रामपंचायत इमारतीसाठी एक कोटींचा निधी जाहीर केला. मग हा निधी कुठे आहे? जाहीर केल्याप्रमाणे त्यांनी निधी द्यावा. त्यांनी वारकरी व ग्रामस्थांच्या भावनेशी खेळू नये असे आवाहन करत घाटगे यांनी आमदार मुश्रीफ यांना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला.