Kolhapur- भाजपचे नेते हवेत पाठी, कमळाला मात्र दिली सोडचिठ्ठी; समरजित घाटगे यांची नवी दिशा
By ऑनलाइन लोकमत | Published: September 4, 2023 04:30 PM2023-09-04T16:30:16+5:302023-09-04T16:33:38+5:30
विधानसभेच्या लढाईचे रणशिंग
कोल्हापूर : कागलविधानसभा मतदारसंघातून भाजपचे नेते समरजित घाटगे यांनी अपक्ष म्हणून निवडणूक लढविण्याची तयारी सुरू केली आहे. त्यांच्या आता सुरू असलेल्या प्रत्येक कार्यक्रमात भाजपच्या नेत्यांना फलकावर स्थान आहे. परंतु, पक्षाच्या नावासह कमळ चिन्ह मात्र हद्दपार झाले आहे. मतदारसंघात कार्यकर्त्यांत त्याबाबत जोरदार चर्चा आहे.
या मतदारसंघातून भाजपचे उमेदवार म्हणून समरजित हे गेल्या विधानसभेत पराभव झाल्यापासून रस्त्यावर उतरले आहेत. गेल्या निवडणुकीत झालेल्या तिरंगी लढतीत त्यांनी ९० हजारांवर मते मिळवून जोरदार हवा निर्माण केली. गेल्या विधानसभेला भाजप-शिवसेनेच्या वाटणीत ही जागा शिवसेनेच्या वाट्याला गेली. त्या पक्षाकडून संजय घाटगे यांनी ही निवडणूक लढवली. परंतु, ते तिसऱ्या स्थानावर फेकले गेले. कारण त्यांना तालुक्यातील शिवसेनेतूनच फारशी मदत झाली नाही. त्यामुळे मुख्य लढत राष्ट्रवादीचे नेते हसन मुश्रीफ व समरजित यांच्यातच झाली. पहिल्यांदा लढत देऊनही समरजित यांनी मुश्रीफ यांना जोरदार टक्कर दिली. पराभव झाल्यावर लगेचच ते पुढच्या विधानसभेच्या तयारीला लागले. त्यांचा प्रत्येक कार्यक्रम २०२४ ची विधानसभा डोळ्यासमोर ठेवूनच होत असताना मध्यंतरी राज्याच्या राजकारणात राजकीय फेरपालट झाला.
राष्ट्रवादीचे नेते अजित पवार हे सरकारमध्ये सहभागी झाल्याने त्यांच्यासोबत मुश्रीफ हे गेल्याने त्यांना वैद्यकीय शिक्षण खात्याचे मंत्रिपद मिळाले. आता मूळ भाजप, शिवसेना-शिंदे गट व राष्ट्रवादी-अजित पवार गट मिळून लोकसभा-विधानसभा निवडणुकीला सामोरे जाण्याचा निर्णय या तिन्ही पक्षांच्या महायुतीने घेतला आहे. त्यामुळे कागलची महायुतीची उमेदवारी विद्यमान आमदार व मंत्री म्हणून मुश्रीफ यांनाच मिळणार हे स्पष्ट आहे. त्यामुळे समरजित यांना विधानसभेला भाजप व कमळ चिन्हाचा वापर करता येणार नाही. त्यावेळी अपक्ष म्हणून जे चिन्ह मिळेल ते घेऊन त्यांना लढावे लागेल. त्याची तयारी म्हणूनच त्यांनी आतापासूनच आपल्या फलकावरील कमळ दूर केले आहे. पक्षाचे नेते व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे मोठे पाठबळ त्यांना असल्याने त्यांच्यासह अन्य नेत्यांचे फोटो मात्र ते जरूर वापरत आहेत.
तयारीसाठी दीड वर्ष..
गेल्या निवडणुकीत ऐनवेळी अपक्ष लढावे लागल्याने लोकांपर्यंत पोहोचण्यास मर्यादा आल्या. आता अपक्ष लढावे लागणार हे वर्ष-दीड वर्ष अगोदरच समजल्याने त्यादृष्टीनेच त्यांची मोर्चेबांधणी सुरू आहे. एका बाजूला भाजपच्या सत्तेचा वापर करून मतदारसंघातील विकासकामांचा धडाका सुरू आहे. शासन आपल्या दारी उपक्रमात मंत्री मुश्रीफ यांना सहभागी करून घ्यावे लागते म्हणून त्यांनी या कार्यक्रमाचे नाव बदलून समरजित आपल्या दारी असे केले. राजे फाउंडेशन, शाहू समूह, राजमाता जिजाऊ महिला समितीच्या माध्यमातून ते सगळे कार्यक्रम घेऊ लागले आहेत.