भाजपचे आंब्यात, तर महाविकास आघाडीचे सदस्य पन्हाळ्यावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 10, 2021 04:18 AM2021-07-10T04:18:05+5:302021-07-10T04:18:05+5:30
कोल्हापूर : जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष, उपाध्यक्षपदाची निवड सोमवारी होणार आहे. या पार्श्वभूमीवर भाजपचे चौदा सदस्य ...
कोल्हापूर : जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष, उपाध्यक्षपदाची निवड सोमवारी होणार आहे. या पार्श्वभूमीवर भाजपचे चौदा सदस्य आंब्यात दाखल झाले आहेत. महाविकास आघाडीचे ४१ सदस्य शनिवारी पन्हाळ्यावर रवाना होत आहेत. कर्नाटक आणि गोव्यात आरटीपीसीआरचा निगेटिव्ह अहवाल बंधनकारक असल्याने अन्य राज्यात सहल काढण्यावर मर्यादा आल्या आहेत.
अध्यक्ष, उपाध्यक्ष निवड सोमवारी असली तरी गेले चार दिवस याबाबत हालचाली सुरू झाल्या. यातूनच मग भाजपचे काही सदस्य गुरुवारी तर उर्वरित सदस्य शुक्रवारी आंब्यात दाखल झाले आहेत. महाविकास आघाडीच्या सदस्यांना शनिवारी दुपारपर्यंत पन्हाळ्यावर नेण्यात येणार आहे. याच ठिकाणी नेते रविवारी इच्छुकांच्या मुलाखती घेणार आहेत.
महाविकास आघाडीकडे भक्कम बहुमत आहे. परंतु अध्यक्षपद कोणाकडे यावरून काही अडचण उद्भवू नये, यासाठी सर्वांनाच पन्हाळ्यावर एकत्र ठेवण्यात येणार आहे. जनसुराज्यचे सहा सदस्य घरीच असून अन्य विरोधी आघाडीतील छोट्या गटांचे सदस्यही सहलीवर गेलेले नाहीत. बहुतांशी ठिकाणी सदस्य पत्नी असेल तर पतीच सहलीवर गेले आहेत. सोमवारी या सर्वांना कोल्हापुरात आणण्यात येणार आहे.