कागलमध्ये महाविकास आघाडी विरुद्ध भाजप सामना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 24, 2021 04:29 AM2021-08-24T04:29:37+5:302021-08-24T04:29:37+5:30

कागल : कागल नगरपालिकेच्या निवडणुकीसाठी शहरातील दोन्ही प्रमुख गटांची तयारी सुरू झाली आहे. सतत राजकीय उलाढाली आणि हालचालीचे केंद्र ...

BJP match against Mahavikas Aghadi in Kagal | कागलमध्ये महाविकास आघाडी विरुद्ध भाजप सामना

कागलमध्ये महाविकास आघाडी विरुद्ध भाजप सामना

Next

कागल : कागल नगरपालिकेच्या निवडणुकीसाठी शहरातील दोन्ही प्रमुख गटांची तयारी सुरू झाली आहे. सतत राजकीय उलाढाली आणि हालचालीचे केंद्र असलेल्या कागल तालुक्यात पालिका ताब्यात असणे खूप महत्त्वाचे असते. सध्या सुरू असलेल्या हालचालीवरून महाविकास आघाडी विरुद्ध भाजप अशी लढत होण्याची शक्यता आहे.

मंत्री हसन मुश्रीफ यांच्या गावची नगरपालिका म्हणून राज्यभर या नगरपालिकेची ओळख आहे. त्या अनुषंगाने मोठा विकास निधीही या पालिकेला मिळत आला आहे. सलग पंधरा वर्षे कागलकरांनी त्यांच्या हाती पालिकेची सत्ता दिली आहे. असे असले तरी गेल्या निवडणुकीत शाहू साखर कारखान्याचे अध्यक्ष समरजित घाटगे यांनी भाजपच्या माध्यमातून जबरदस्त राजकीय पदार्पण करीत राष्ट्रवादी काँग्रेस आणि मित्र पक्ष आघाडीला जोरदार टक्कर दिली होती. अगदी निसटता पराभव झाला होता. तेव्हा राज्यात भाजपची सत्ता तर होतीच, त्याचबरोबर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची खास मर्जी समरजित यांच्यावर होती. राज्यमंत्री पदाचा दर्जा असलेले पुणे म्हाडाचे अध्यक्षपद दिमतीला होते. तर मंत्री मुश्रीफ यांच्या सख्ख्या भावजय बिल्किश मुश्रीफ यांनी बंडखोरी करीत नगराध्यक्षपदाची निवडणूक लढविली होती. संजय मंडलिक यांचा पाठिंबा समरजित यांना मिळवून देण्यात तत्कालीन मंत्री चद्रंकात पाटील यशस्वी झाले होते. सत्तेचा पुरेपूर वापर करीत मंत्री मुश्रीफ यांची कागलातच कोंडी करण्यात भाजप यशस्वी ठरला होता; पण समरजित घाटगे यांचा राजकीय अनुभव कमी पडला आणि चाळीस वर्षांत अनेक निवडणुकांचा अनुभव पाठीशी असलेल्या मुश्रीफ यांनी मुत्सद्दीपणा पणाला लावत सत्ता कायम राखली. आता खासदार संजय मंडलिक, माजी आमदार संजय घाटगे यांची भूमिका मंत्री मुश्रीफ यांच्याबरोबर राहणार की कसे हे पाहावे लागेल.

काट्याची टक्कर होणार..

गेल्यावेळी एक वर्ष आधीच रणांगण सुरू झाल्याचे चित्र होते. आता तसे अजून वातावरण दिसत नाही. कोरोना महामारी व अन्य कारणांनी विरोधी गटाला सत्ताधारी गटाविरुद्ध रान उठविता आलेले नाही. त्यामुळे सत्ताधारी गटाला सध्या अनुकूल वातावरण दिसत असले तरी शहरातील राजे गटाची पारंपरिक ताकत कमी झालेली नाही. समरजित घाटगे यांनी गट सक्रीय ठेवला आहे. वीस प्रभागात चार-पाच प्रभाग सोडले तर सर्वच ठिकाणी काट्याची टक्कर होणार आहे.

यांच्या भूमिका महत्त्वाच्या

गतवेळी मंडलिक गटाने ऐनवेळी भाजपसोबत जाण्याचा निर्णय घेतल्यानंतरही श्रीनाथ समूहाचे चंद्रकांत गवळी मुश्रीफ यांच्या पाठीशी ठाम उभे राहिले, तर कागल ज्युनिअर अखिलेशसिंह घाटगे यांनी स्वतःचे उमेदवार उभे करून ताकत दाखवली होती. आतादेखील चद्रंकात गवळी आणि अखिलेशसिंह यांच्या भूमिकांना महत्त्व असणार आहे.

सध्याचे बलाबल

राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेना अपक्ष आघाडी - ११

( राष्ट्रवादी- ०८ शिवसेना - ०२ अपक्ष- ०१)

○ भारतीय जनता पार्टी = ०९

(०९ पैकी माधवी मोरबाळे, मंगल गुरव यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे, तर स्वीकृत नगरसेवक सुरेश पाटील हे देखील भाजपसोबत नाहीत.

Web Title: BJP match against Mahavikas Aghadi in Kagal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.