मोदींना पाठबळ देणारा खासदार कोल्हापुरातून निवडून द्या, शिवराजसिंह चौहान यांचे आवाहन
By समीर देशपांडे | Published: February 24, 2024 03:22 PM2024-02-24T15:22:44+5:302024-02-24T15:24:55+5:30
'नरेंद्र मोदी सत्तेवर आल्यानंतर भ्रष्टाचाऱ्यांवर किमान कारवाई तरी सुरू झाली'
कोल्हापूर : विकसित भारत करण्यासाठी नरेंद्र मोदी यांना तिसऱ्यांना पंतप्रधान करावे लागेल. त्यासाठी पाठबळ देणारा खासदार कोल्हापुरातून निवडून द्या असे आवाहन मध्यप्रदेशचे माजी मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी केले आहे. येथील महासैनिक दरबार हॉलमधील भाजप पदाधिकारी, कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात ते बोलत होते.
यावेळी खासदार धनंजय महाडिक, जिल्हाध्यक्ष विजय जाधव, राहूल देसाई, राजवर्धन निंबाळकर यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते. मोदी यांनी राबवलेल्या विविध योजनांचा दाखला देत चौहान यांनी या सर्व योजना आणखी प्रभावीपणे राबवण्यासाठी तिसऱ्यांदा मोदी पंतप्रधान होण्याची गरज आहे. यावेळी त्यांनी मध्यप्रदेशमध्ये राबवलेल्या विविध लोकप्रिय योजनांची माहिती दिली.
‘ममता’आता क्रूर झाल्या
तत्पूर्वी पत्रकार परिषदेत बोलताना ते म्हणाले, पश्चिम बंगालमध्ये ज्या पध्दतीने घटना घडत आहेत. त्या पाहता ममता बॅनर्जी यांच्यातील ‘ममता’आता संपली असून त्या क्रूर झाल्या आहेत. मीच व्यापमचा घोटाळा बाहेर काढला आणि देाषींवर कारवाईचे आदेश दिले. याआधी भ्रष्टाचाऱ्यांवर कारवाईच होत नाही असे चित्र होते. परंतू नरेंद्र मोदी सत्तेवर आल्यानंतर किमान कारवाई तरी सुरू झाली. सर्व तपास आणि कारवाई करणाऱ्या यंत्रणा त्यांच्या पध्दतीने काम करत असून यामध्ये सरकारची कोणतीही भूमिका नाही. त्याआधी चौहान यांनी अंबाबाईचे दर्शन घेतले. यानंतर त्यांनी बिंदू चौकात ‘चाय पे चर्चा’ कार्यक्रमात नागरिकांचे प्रश्न समजून घेतले.