सत्तेसाठी भाजप आशावादी; शिवसेना सावध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 10, 2017 12:03 AM2017-03-10T00:03:50+5:302017-03-10T00:03:50+5:30
जिल्हा परिषद : दुधवडकर घेणार शिवसेना आमदार-पदाधिकाऱ्यांची बैठक
कोल्हापूर : जिल्हा परिषदेच्या सत्तेसाठी एकीकडे भाजप आशावादी असताना शिवसेनेने मात्र सावध भूमिका घेतली आहे. पंचायत समित्यांच्या सभापती निवडी चार दिवसांवर आल्याने उद्या, शनिवारी आणि परवा (रविवारी) याबाबतच्या हालचाली वेगावणार आहेत. शिवसेनेचे संपर्कप्रमुख अरुण दुधवडकर हे शनिवारी रात्री किंवा रविवारी सकाळी शिवसेनेचे आमदार व जिल्हाप्रमुखांची महत्त्वाची बैठक घेणार आहेत.
बुधवारी (दि. ८) मुंबईत शिवसेनेचा महापौर झाला. त्यासाठी भाजपने विनाअट मतदान केले. त्यामुळे आता जिल्ह्यातही शिवसेना भाजपच्या पाठीशी राहील, असा आत्मविश्वास महसूलमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी व्यक्त केला आहे; तर दुसरीकडे शिवसेनेमध्ये येणाऱ्या दोन दिवसांत घडामोडी घडण्याची शक्यता आहे. एकीकडे कॉँग्रेसच्या जिल्हा परिषद सदस्यांच्या सत्कारावेळी बहुमतासाठी केवळ एक सदस्य कमी असल्याचे सांगून कॉँग्रेसचे जिल्हाध्यक्ष पी. एन. पाटील यांनी बॉम्ब टाकला असताना, आता शिवसेना नेमके काय करणार याकडे सर्व राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. कॉँग्रेसच्या प्रयत्नांना पाठिंबा देणे अशी सध्या राष्ट्रवादीची भूमिका असून, स्थानिक आघाड्यांच्या भूमिकाही महत्त्वाच्या ठरणार आहेत.
कुठली स्थानिक आघाडी कुणाबरोबर राहणार याचे आडाखे बांधायचे काम सुरू असले तरी याबाबतही गुप्तता पाळली जात आहे. सगळ्यांत महत्त्वाचे म्हणजे शिवसेना एकसंधपणे कुणा एका पक्षाच्या पाठीशी राहणार, की तिथेही फूट पडणार, हा विषय महत्त्वाचा आहे.
एकसंध शिवसेनेचा पाठिंबा भाजपच्या फायद्याचा
जर मुंबईतील भाजपच्या एक पाऊल मागे घेण्याने उद्धव ठाकरे यांनी नरमाईचे धोरण स्वीकारले आणि कोल्हापूर जिल्हा परिषदेत ठामपणे सर्व १० सदस्यांनी भाजपसोबत राहिलेच पाहिजे; पुढचे पुढे बघू, अशी भूमिका घेतली तरच भाजप-शिवसेना सत्तेवर येण्याची शक्यता बळावते. मात्र त्यांनी ‘तुमच्या सोयीने निर्णय घ्या,’ असे सांगितल्यास शिवसेनेतही फूट पडण्याची शक्यता आहे.
शनिवारी-रविवारी होणार घडामोडी
सर्वपक्षीय सर्व नेते हे शनिवारी-रविवारी कोल्हापुरात असणार आहेत. मंगळवारी (दि. १४) बाराही तालुक्यांच्या सभापती निवडी आहेत. त्यामुळेच या दोन दिवसांत राजकीय हालचाली वेगाने घडण्याची शक्यता आहे.
शिवसेनेचे संपर्कप्रमुख अरुण दुधवडकर हे उद्या, शनिवारी कोल्हापुरात येत आहेत. याच दिवशी संध्याकाळी जर सर्व आमदार आणि आम्ही तीन जिल्हाप्रमुख एकत्र आलो तर किंवा रविवारी (दि. १२) ते बैठक घेतील. त्यामध्ये यावर चर्चा अपेक्षित आहे.
- संजय पवार, जिल्हाप्रमुख शिवसेना
शिवसेना सोबत येणार आहे. याबाबतच्या वेगवेगळ्या पातळ्यांवरील चर्चा सुरू आहेत. काही गोष्टी ठरल्याही आहेत. त्यामुळे जिल्हा परिषदेत भाजप-शिवसेना व मित्रपक्ष आघाड्यांची सत्ता येणार, यात तीळमात्र शंका नाही.
- आमदार सुरेश हाळवणकर, भाजप नेते