सत्तेतील भाजप आघाडी एकसंध नाही
By admin | Published: March 29, 2017 12:55 AM2017-03-29T00:55:13+5:302017-03-29T00:55:13+5:30
हसन मुश्रीफ यांचा पलटवार : पालकमंत्र्यांना रोजच ‘लॉलीपॉप’ दाखवावे लागते
कागल : कोल्हापूर जिल्ह्यातील प्रत्येक निवडणुकीत पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांना अपयशच येत गेल्यामुळे त्यांनी काहीही करून जिल्हा परिषदेत भाजपचा अध्यक्ष करायचाच म्हणून विळ्या-भोपळ्याची मोट बांधून ही आघाडी केली आहे. या आघाडीत खूप मोठे मतभेद-हेवेदावे आहेत. भाजपची ही आघाडी एकसंध नाही. अन्यथा पालकमंत्र्यांना रोज ‘लॉलीपॉप’ दाखवावे लागले नसते, असा पलटवार राष्ट्रवादीचे नेते आमदार हसन मुश्रीफ यांनी केला.
गुढीपाडव्याच्या शुभेच्छा देण्यासाठी त्यांनी स्थानिक पत्रकारांना चहापान आयोजित केले होते. त्यावेळी ते बोलत होते. पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी आ. मुश्रीफ, आ. सतेज पाटील हे छोट्या मनाचे आहेत, अशी टीका केली आहे. त्या अनुषंगाने ते म्हणाले की, जनतेने आमच्यावर विरोधकांची जबाबदारी सोपवली आहे. ती आम्ही पार पाडीत आहोत.
कोल्हापूर जिल्हा देशात अग्रेसर करण्यासाठी पालकमंत्र्यांनी प्रयत्न करावेत. मी आणि सतेज पाटील त्यांच्या खांद्याला खांदा लावून काम करू. जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष निवडीत आम्ही दिग्गज एकत्र असताना आमचे अंदाज फसले, चुकले. आयुष्यभर काँग्रेसशी एकनिष्ठ असलेले प्रकाश आवाडे तसेच पाच वर्षे राष्ट्रवादीला बाजूला ठेवून स्वाभिमानी शेतकरी संघटनेला जिल्हा परिषदेत सत्ता देण्याचे काम काँग्रेसने केल्याने खा. राजू शेट्टी काँग्रेसबरोबरच राहतील असा विश्वास होता, तर सत्तेच्या जोरावर आमचे दोन सदस्य गैरहजर राहिले. शेवटच्या क्षणी सत्यजित पाटील भाजप आघाडीत गेले. यामुळे हा विजय आमच्या हातून निसटला. मात्र, विरोधकांची भूमिका आम्ही निश्चितपणे चोखपणे पार पाडणार आहोत.
आम्हीही १५ वर्षे सत्तेत होतो; पण सत्तेचा इतका गैरवापर केला नव्हता. खासदार महाडिकांच्या भूमिकेबद्दल विचारले असता आ. मुश्रीफ म्हणाले की, आज गुढीपाडवा शुभ दिवस आहे. चांगलेच बोलूया. आमच्या कार्यकर्त्यांच्या मनातील भावना भैया माने यांनी बोलून दाखविल्याच आहेत, असेही ते म्हणाले. (प्रतिनिधी)
विकासासाठी पालकमंत्री बोलवतील तिथे जाऊ
माझे गुरू कै. मंडलिकसाहेब म्हणायचे की, पृथ्वी गोल आहे. पृथ्वी निक्षत्रीय होऊ द्यायची नाही. विरोधकांची पोकळी राहता कामा नये. कोणीतरी माईचा लाल पुढे आला पाहिजे. म्हणून आम्ही प्रामाणिकपणे विरोधाची भूमिका पार पाडू; पण कोल्हापूर जिल्ह्याच्या विकासाच्या मुद्द्यावर पालकमंत्री जेव्हा बोलवतील, तेव्हा आम्ही तेथे हजर राहू.