‘लक्ष्मी’ कमळाच्या आडून भाजपचा प्रचार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 28, 2018 01:02 AM2018-11-28T01:02:55+5:302018-11-28T01:03:00+5:30

राजाराम लोंढे । लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : हरियाणा, उत्तरप्रदेशमध्ये भारतीय जनता पक्षाने निवडणुकीपूर्वी नजर पडेल तिथे ‘कमळ’ रेखाटले. ...

BJP propaganda by 'Lakshmi Kamal' | ‘लक्ष्मी’ कमळाच्या आडून भाजपचा प्रचार

‘लक्ष्मी’ कमळाच्या आडून भाजपचा प्रचार

Next

राजाराम लोंढे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : हरियाणा, उत्तरप्रदेशमध्ये भारतीय जनता पक्षाने निवडणुकीपूर्वी नजर पडेल तिथे ‘कमळ’ रेखाटले. त्याचा चांगला परिणाम सत्ता येण्यात झाल्याने हा फंडा महाराष्ट्रातही वापरला जाणार आहे. त्याचाच एक भाग म्हणून कोल्हापूर शहरासह जिल्ह्यात रहदारीच्या ठिकाणी ‘लक्ष्मी’ कमळ रेखाटले जात आहे. प्रत्येक विधानसभा मतदारसंघात १५०० कमळ भिंंतीवर रेखाटली जाणार असून, निवडणूक आयोगाच्या आचारसंहितेत अडकू नये म्हणून भाजपच्या ‘कमळ’ चिन्हाऐवजी ‘लक्ष्मी’च्या हातातील ‘कमळ’ काढले जात आहे.
देशात रोज नवतंत्रज्ञान येत असून सर्वच यंत्रणा झपाट्याने बदलत आहेत. सारा देश सोशल मीडियाशी जोडल्याने निवडणुकीची प्रचार यंत्रणाही गतिमान झाली आहे. प्रचारासाठी सर्वच राजकीय पक्षांकडून वेगवेगळ्या क्लृप्त्या वापरल्या जात आहेत. यामध्ये सर्वांत पुढे भाजप हा पक्ष असून हायटेक प्रचारयंत्रणेच्या बळावरच त्यांनी सारा देश भगवामय केला आहे. उत्तर प्रदेश, हरियाणासह उत्तरेकडील अनेक राज्यांच्या निवडणुकीपूर्वी नजर पडेल तिथे ‘कमळ’ हा फंडा राबविला होता. गेल्या पंधरा-वीस दिवसांपासून कोल्हापूर शहरात विविध ठिकाणी ‘कमळ’ रेखाटलेले दिसते. आतापर्यंत ते शहरात ९०० ठिकाणी रेखाटले असून, येत्या आठ-दहा दिवसांत ६०० ठिकाणी ‘कमळ’ रेखाटले जाणार आहे. ‘कोल्हापूर उत्तर’मध्ये पांढऱ्या गोलामध्ये कमळ रेखाटले आहे. कोल्हापूर दक्षिणमध्ये पाण्यातून हात वर आला आणि त्या हातात असलेले कमळ रेखाटले आहे. यावर कॉँग्रेसने हरकत घेतली असली तरी निवडणूक आयोगाने हरकत घेऊ नये म्हणून पक्षाचे ‘कमळ’ चिन्ह आणि या कमळात थोडा फरक केला आहे.
‘कमळा’च्या शेजारी ‘हात’ येणार
शहरात भाजपच्या वतीने ‘कमळ’ चिन्ह रेखाटले आहे. त्यावर कॉँग्रेस पक्षाने हरकत घेतली तरी ते काढून टाकणे तितकेसे सोपे नाही. त्यामुळे जिथे ‘कमळ’ रेखाटले आहे, त्याच्या दोन्ही बाजूंना ‘हात’ रेखाटण्याची सूचना कॉँग्रेसच्या नेत्यांनी कार्यकर्त्यांना दिली आहे.
लोकसभेच्या तयारीचा आढावा
भाजपने लोकसभेची जोरदार तयारी केली असून लोकसभा मतदारसंघनिहाय बूथ कमिट्यांकडून आढावा सुरू आहे. मंगळवारी भाजपचे संघटन सचिव रवी अनासपुरे व मकरंद देशपांडे यांनी ‘कोल्हापूर ’व ‘हातकणंगले’ मतदारसंघांचा आढावा घेऊन घर ते घर संपर्क मोहिमेचे आदेश दिले.

Web Title: BJP propaganda by 'Lakshmi Kamal'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.