पराभवाचा वचपा काढण्यास भाजप सज्ज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 3, 2020 04:24 PM2020-12-03T16:24:32+5:302020-12-03T16:29:03+5:30
bjp, kolhapur, muncipaltycarporotion, कोल्हापूर महानगरपालिकेच्या गत निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने स्थानिक छत्रपती ताराराणी आघाडीशी युती करून महापालिकेवर आपला झेंडा फडकविण्याचा केलेला प्रयत्न थोडक्यात फसला. त्यामुळे यावेळच्या निवडणुकीत तोच फॉर्म्युला घेऊन नव्या ताकदीने निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची तयारी भाजपने केली आहे.
कोल्हापूर : महानगरपालिकेच्या गत निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने स्थानिक छत्रपती ताराराणी आघाडीशी युती करून महापालिकेवर आपला झेंडा फडकविण्याचा केलेला प्रयत्न थोडक्यात फसला. त्यामुळे यावेळच्या निवडणुकीत तोच फॉर्म्युला घेऊन नव्या ताकदीने निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची तयारी भाजपने केली आहे. ५० हून अधिक जागा जिंकण्याचे उद्दिष्ट डोळ्यांसमोर ठेवून भाजपकडून आडाखे बांधले जात आहेत. पक्षाची स्थानिक यंत्रणा सध्या महापालिका निवडणुकीतील रणनीती ठरविण्याचे काम करीत आहे.
गत निवडणुकीत देशात आणि राज्यात भारतीय जनता पक्षाचे सरकार होते; त्यामुळे महानगरपालिकेच्या २०१५ मध्ये झालेल्या निवडणुकीत भाजपचा सर्वाधिक बोलबाला होता; परंतु पक्षाचे स्थानिक नेते आपली कोल्हापूर शहरातील राजकीय ताकद ओळखून होते.
भाजपला एकट्याने निवडणुकीत उतरणे अशक्य होते; त्यामुळे त्यांनी स्थानिक ताराराणी आघाडीशी हातमिळवणी केली. आघाडीने एकत्रित निवडणूक लढवून कॉग्रेस-राष्ट्रवादीला चांगलेच जेरीस आणले. पहिल्याच प्रयत्नात भाजप-ताराराणी आघाडीने ३३ जागा जिंकल्या. त्यात भाजपचा १४ जागांचा वाटा होता. नंतर एका अपक्षाने भाजपला पाठिंबा दिल्याने संख्याबळ १५ वर पोहोचले.
निवडणुकीच्या काळात चंद्रकांत पाटील पालकमंत्री होते. मंत्रिमंडळातील चार प्रमुख खाती त्यांच्याकडे होती. त्यामुळे त्यांचा निवडणुकीवर मोठा प्रभाव राहिला. एकीकडे चंद्रकांत पाटील, तर दुसरीकडे महादेवराव महाडिक व अमल महाडिक असा राजकीय करिष्मा असलेले नेते असल्याने भाजपची शहरात भलतीच हवा निर्माण झाली.
कॉग्रेस-राष्ट्रवादीसमोर मोठे आव्हान तयार करण्यात भाजप यशस्वी ठरला; पण महापालिकेवर झेंडा फडकविण्यात ते अयशस्वी ठरले. आणखी पाच ते सहा जागा मिळविता आल्या असत्या तर भाजपने आपले महापौर केले असते; पण गणित चुकले. सत्ता आणण्याचे स्वप्न थोडक्यात भंगले.
गतवेळच्या निवडणुकीत थोडक्यात संधी हुकल्यामुळे चंद्रकांत पाटील खूप अस्वस्थ होते. त्यांनी पुढे एक वर्षभर तरी चमत्कार होईल, महापौर भाजपचा होईल अशी भविष्यवाणी सांगण्यात घालविले. शेवटी काही जमत नाही म्हटल्यावर त्यांनी नाद सोडून दिला; परंतु त्यांच्या मनातील सल ही गेल्या पाच वर्षांपासून त्यांना स्वस्थ बसू देत नाही.
आता राज्यात त्यांची सत्ता नसली तरी भाजपचे प्रदेशाध्यक्ष म्हणून त्यांचे पक्षात मानाचे स्थान आहेच; शिवाय वरिष्ठ नेत्यांचीही त्यांच्यावर विशेष मर्जी आहे. त्यामुळे विरोधी पक्षात असले तरी निवडणुका लढविण्याचे तंत्र, कौशल्ये, आयुधे त्यांच्याकडे आहेत.
महादेवराव महाडिक यांच्यासह माजी खासदार धनंजय महाडिक व त्यांची युवाशक्ती त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभी आहे. भाजपची ही सर्वांत मोठी जमेची बाजू आहे. ५० पेक्षा अधिक जागा जिंकून महापालिकेवर भाजपचा झेंडा फडकाविण्याचा निर्धार कार्यकर्त्यांनी केला आहे.
केलेले काम हाच अजेंडा
केंद्रातील व राज्यातील भाजप सरकारच्या काळात केलेली विकासकामे, टोलपासून केलेली कोल्हापूरकरांची मुक्ती, मुद्रा योजना, मोफत गॅस कनेक्शन, गोल्डन कार्ड यांसारख्या सरकारच्या विविध योजनांचा लाभार्थ्यांना मिळवून दिलेला लाभ, शहरात अमृत योजनेतून ड्रेनेज लाईन व पाणीपुरवठा करणाऱ्या नलिका टाकण्यासाठी आणलेला निधी हाच अजेंडा घेऊन भाजप निवडणुकीत उतरणार आहे. निवडणूक व्यूहरचनेत मतदारांसमोर जाताना कसे जायचे, याचा आराखडाही तयार केला जात आहे.
नेत्यांच्या जोर-बैठका सुरू
चंद्रकांत पाटील, धनंजय महाडिक, अमल महाडिक, देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव, भाजप महानगर अध्यक्ष राहुल चिकोडे असे नेते महानगरपालिका निवडणुकीच्या तयारीच्या निमित्ताने बैठका, गाठीभेटी, प्रभागांतील उमेदवारांची चाचपणी करीत आहेत. ठरवून नसले तरी ज्या ज्या वेळी चंद्रकांत पाटील कोल्हापुरात असतील, त्या त्या वेळी महापालिका निवडणुकीच्या निमित्ताने चर्चा होत आहेत. माजी खासदार अमर साबळे हे पक्षाचे निरीक्षक म्हणून काम पाहणार आहेत.
गत निवडणुकीतील पक्षाची कामगिरी
- भारतीय जनता पक्षाने लढविलेल्या जागा - ३७
- जिंकलेल्या जागा - १४ १ (अपक्ष)
- महापालिकेत चौथ्या स्थानावर
- पक्षाच्या उमेदवारांना मिळालेली मते - ४६ हजार ०७७
- एकूण मतांची टक्केवारी - १६.१३