मिशन मुख्यमंत्री! भाजपची स्वतंत्र लढण्याची तयारी!

By ऑनलाइन लोकमत | Published: July 31, 2019 06:06 AM2019-07-31T06:06:56+5:302019-07-31T06:08:04+5:30

पश्चिम महाराष्ट्र : राष्ट्रवादीच्या असंतुष्टांवर लक्ष केंद्रित

BJP ready to fight independently! for vidhansabha election 2019 | मिशन मुख्यमंत्री! भाजपची स्वतंत्र लढण्याची तयारी!

मिशन मुख्यमंत्री! भाजपची स्वतंत्र लढण्याची तयारी!

Next

वसंत भोसले 

कोल्हापूर : भारतीय जनता पक्ष शिवसेनेशी युती करून आगामी विधानसभा निवडणुका लढविण्याची भाषा करीत असला तरी निवडणुकीला स्वतंत्रपणे सामोरे जाण्याची तयारी करीत आहे. पश्चिम महाराष्ट्रातील पाच जिल्ह्यांतील ५८ मतदारसंघांत सक्षम उमेदवार मिळविण्यासाठी त्यांनी जोरदार आखणी केली असून, कॉँग्रेस आणि राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या असंतुष्टांवर त्यांनी लक्ष केंद्रित केले आहे.
गेल्या वेळी मोदी लाटेवर स्वार होऊन भाजपने १२२ जागा जिंकल्या होत्या. बहुमतासाठी केवळ तेवीस जागा कमी पडल्या. काही अपक्ष आणि सहकारी पक्षांसह ही संख्या १३२वर गेली होती, तरीदेखील बहुमतासाठी १३ जागा कमी पडल्याने अखेर शिवसेनेशी आपल्या शर्र्थींवर युती करून पाच वर्षे सरकारने कार्यकाल पुरा केला.

मधल्याकाळात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सर्व निवडणुका स्वतंत्रपणे लढवित भाजपने राज्यातील सर्वांत मोठा पक्ष झाल्याचा दावा खरा करून दाखविला. चौदा महापालिका, नगरपालिका आणि निम्म्या जिल्हा परिषदांवर तडजोडी करीत सत्ता आणली. यादरम्यान शिवसेनेशी सातत्याने शाब्दिक संघर्ष होत राहिला, पण युती तुटली नाही. लोकसभा निवडणुकीत कॉँग्रेस आणि राष्ट्रवादीने आघाडी करताच भाजपने शिवसेनेशी युती केली आणि पुन्हा घवघवीत यश मिळविले. लोकसभेत स्पष्ट बहुमतासह २१ जादा जागा पटकाविल्या.
लोकसभेतील यश, मोदींची प्रतिमा आणि मुख्यमंत्री फडणवीस यांनी पूर्ण केलेल्या कार्यकालावर भाजपचाच पुन्हा मुख्यमंत्री होणार, असे जाहीर करून शिवसेनेच्या मागण्यांकडे दुर्लक्ष करण्याची तयारी केली आहे. पश्चिम महाराष्ट्रात भाजप प्रथम क्रमांकावर असला तरी कॉँग्रेस आणि राष्ट्रवादी कॉँग्रेसचे बळ, होणारी आघाडी पाहता प्रत्येक मतदारसंघात सक्षम उमेदवार शोधण्याची मोहीम गेली वर्षभर जोरात राबविण्यात आली आहे. केवळ एका उमेदवारावर अवलंबून न राहता, अनेक मतदारसंघांत पर्यायी उमेदवारही तयार केले आहेत. पाच वर्षांच्या अखेरीस अनेक महामंडळांची अध्यक्षपदे तसेच त्यांना राज्यमंत्र्यांचा दर्जा देऊन बळ दिले आहे. भाजपचे संघटन कमकुवत असलेल्या मतदारसंघात कॉँग्रेस किंवा राष्ट्रवादीचा सक्षम कार्यकर्ता, आमदार यांना पक्षात घेण्याची मोहीमच उघडली आहे. शिवाय अनेक विकासकामांची उद्घाटने करणे, आश्वासने देणे, प्रसंगी संभाव्य उमेदवाराला आर्थिक बळ देण्याची तयारीही केली आहे. त्यामुळे भाजपची ही सर्व वाटचाल स्वतंत्रपणे निवडणुकांना सामोरे जाण्याची आहे, हे स्पष्ट होते. भाजपच्या तुलनेत शिवसेना आणि कॉँग्रेसची तयारी कमी आहे. राष्ट्रवादीची ताकद आहे. मात्र, त्यांचे अनेक आमदार नाराज होऊन भाजपच्या वाटेवर आहेत. शिवाय कॉँग्रेसचेही काहीजण गळाला लागण्याची शक्यता आहे.

पश्चिम महाराष्ट्राचे पक्षीय बलाबल
जिल्हा एकूण जागा भाजप सेना काँग्रेस राष्ट्रवादी इतर
पुणे २१ १३ ४ १ ३ -
सोलापूर ११ २ १ ३ ४ १
सातारा ८ ० १ २ ५ -
सांगली ८ ४ १ १ २ -
कोल्हापूर १० २ ६ - २ -
एकूण ५८ २१ १३ ७ १६ १

३ जिल्ह्यांत ४ आमदार
पुणे शहर आणि जिल्ह्यात मिळालेल्या यशाच्या जोरावर भाजप सध्या पश्चिम महाराष्ट्रातही प्रथम क्रमांकावर आहे. सध्या त्यांचे २१ आमदार आहेत. त्याखालोखाल राष्ट्रवादीचे सोळा, शिवसेनेचे तेरा, तर कॉँग्रेसचे केवळ सात आमदार आहेत. भाजपने कोल्हापूर, सातारा, सोलापूर जिल्ह्यांवर अधिक लक्ष केंद्रित केले आहे. सातारा जिल्ह्यात एकही आमदार नाही.

Web Title: BJP ready to fight independently! for vidhansabha election 2019

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.