भाजप-ताराराणी आघाडीतही धुसफूस

By admin | Published: October 2, 2015 01:03 AM2015-10-02T01:03:46+5:302015-10-02T01:15:04+5:30

महापालिका रणांगण : सहा जागांवरून रस्सीखेच; दोन ठिकाणी सक्षम उमेदवार नाहीत

BJP-Sarkarani front also smiles | भाजप-ताराराणी आघाडीतही धुसफूस

भाजप-ताराराणी आघाडीतही धुसफूस

Next

कोल्हापूर : महानगरपालिका निवडणुकीसाठी शहरातील ६२ प्रभागांतील उमेदवार जाहीर करून आघाडी घेणाऱ्या भाजप-ताराराणी आघाडीत सहा प्रभागांतील उमेदवार देण्यावरून रस्सीखेच सुरू झाली असून, भाजपच्या एका पदाधिकाऱ्याने उपनगरातील प्रभागात चक्क दोन नंबर व्यवसायाशी संबंधित असलेल्या कार्यकर्त्यासाठी आग्रह धरल्याने हा वाद चिघळण्याची शक्यता आहे.
भाजप, ताराराणी, स्वाभिमानी शेतकरी संघटना, आरपीआय महायुतीने या निवडणुकीकरिता जोरदार तयारी केली असून, उमेदवारी जाहीर करण्यातही त्यांनी आघाडी घेतली आहे. आतापर्यंत ८१ प्रभागांपैकी ६२ प्रभागांतील उमेदवार जाहीर केले असून, आणखी ११ प्रभागांतील उमेदवारांची यादी आज, शुक्रवारी जाहीर होण्याची शक्यता आहे; परंतु कसबा बावड्यातील दोन प्रभागांत सक्षम उमेदवारांचा शोध करावा लागत असून, सहा प्रभागांत उमेदवारी कोणाला द्यायची यावरून भाजप आणि ताराराणी आघाडीतच वाद निर्माण झाला आहे.रंकाळा बसस्थानक प्रभागातून माजी नगरसेवक संभाजी बसुगडे आणि विवेक ऊर्फ विकी महाडिक यांच्यापैकी कोणाला उमेदवारी द्यावी, यावरून ताराराणी आघाडीत मतभेद आहेत. संभाजी बसुगडे हे महाडिक यांचे समर्थक असून महापालिकेत महाडिक यांच्या बाजूनेच राहिले आहेत; तर ‘ताराराणी’तील ‘एस फाइव्ह’ कारभाऱ्यापैकी दोघांचा बसुगडे यांना विरोध आहे. त्यांनी विकी महाडिक यांच्यासाठी आग्रह धरला आहे. त्यामुळे रंकाळा बसस्थानक प्रभागात कोण उमेदवार असेल याबाबत उत्सुकता लागून आहे.
साइक्स एक्स्टेन्शन प्रभागात अनिरुद्ध पाटील आणि कुलदीप देसाई यांच्यात उमेदवारीसाठी चुरस निर्माण झाली असून, विशेष म्हणजे महाडिक कुटुंबातील सदस्यांनी दोघांसाठी आग्रह धरला आहे. त्यामुळे या प्रभागातील उमेदवारीची माळ कोणाच्या गळ्यात पडते याकडे लक्ष लागले आहे.
व्हीनस कॉर्नर प्रभागातून नगरसेवक प्रकाश नाईकनवरे, तर शाहूपुरी तालीम प्रभागातून पूजा स्वप्निल नाईकनवरे यांच्या उमेदवारीचा घोळ सुरू आहे. ताराराणीच्या नेत्यांनी कोणत्याही एका प्रभागात उमेदवारी घ्या, असा आग्रह धरला आहे; तर दिली तर दोन्ही प्रभागांत उमेदवारी द्या, असा आग्रह नाईकनवरे यांनी धरला आहे. त्यामुळे ताराराणीपुढे पेच निर्माण झाला आहे. कारण नाईकनवरे यांच्याव्यतिरिक्त व्हीनस कॉर्नरमधून राहुल चव्हाण यांनी, तर शाहूपुरी तालीम प्रभागातून प्रार्थना समर्थ यांच्या सुनेने उमेदवारी मागितली आहे. (प्रतिनिधी)


भाजपचा अट्टाहास
आमचे उमेदवार स्वच्छ चारित्र्याचे असतील असा दावा पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी केला होता; परंतु त्याला तडा देण्याचा प्रयत्न भाजपच्याच एका पदाधिकाऱ्याने चालविला असल्याचे समजते. उपनगरातील एका प्रभागातून दोन नंबर व्यवसायाशी संबंधित असलेल्या व्यक्तीच्या पत्नीसाठी या पदाधिकाऱ्याने आग्रह धरला आहे; तर ताराराणीच्या नेत्यांनी त्याच्याऐवजी सर्वसामान्य परंतु प्रामाणिक कार्यकर्त्याच्या पत्नीला उमेदवारी द्यावी म्हणून आग्रह धरला आहे. पदाधिकाऱ्याने मात्र हा प्रतिष्ठेचा विषय केला आहे.

Web Title: BJP-Sarkarani front also smiles

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.