अध्यक्ष निवडीच्या पार्श्वभूमीवर भाजपकडून चाचपणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 8, 2021 04:17 AM2021-07-08T04:17:45+5:302021-07-08T04:17:45+5:30

कोल्हापूर: जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीबाबत अजूनही वरिष्ठ पातळीवर निर्णय झालेला नाही; परंतु ...

BJP scrutinizes the background of the election of the President | अध्यक्ष निवडीच्या पार्श्वभूमीवर भाजपकडून चाचपणी

अध्यक्ष निवडीच्या पार्श्वभूमीवर भाजपकडून चाचपणी

Next

कोल्हापूर: जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीबाबत अजूनही वरिष्ठ पातळीवर निर्णय झालेला नाही; परंतु पक्ष जो आदेश देईल त्याला सर्वांना बांधील राहिले पाहिजे अशा स्पष्ट सूचना माजी आमदार सुरेश हाळवणकर यांनी भाजपच्या सदस्यांना दिल्या आहेत. भाजपचे सर्व सदस्य उपस्थित राहिल्याने नेत्यांच्या मनातील शंका दूर झाल्याचे सांगण्यात आले.

ग्रामीण जिल्हाध्यक्ष समरजित घाटगे यांच्या निवासस्थानी बुधवारी झालेल्या बैठकीला भाजपचे सर्व म्हणजे १४ जिल्हा परिषद सदस्य उपस्थित होते; मात्र यावेळी ठोस काही ठरवण्यात आले नसल्याचे सांगण्यात आले. १२ जुलै रोजी अध्यक्ष आणि उपाध्यक्ष निवड होणार आहे. या पार्श्वभूमीवर ही बैठक झाली. यावेळी जिल्ह्यातील कोरोनाच्या स्थितीवरही चर्चा करण्यात आली. ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ आणि पालकमंत्री सतेज पाटील यांनी सर्वांना विकासकामांसाठी निधी दिला आहे. त्यांच्या जाळ्यात कुणी अडकला आहे का याचीही यानिमित्ताने चाचपणी करण्यात आल्याचे समजते.

सध्या जिल्हा परिषदेत भाजप, जनसुराज्य, ताराराणी आघाडी, आवाडे गट एकत्र आहेत. यापैकी पहिल्यांदा भाजपच्या सदस्यांची चाचपणी करण्यात आली. ज्येष्ठ सदस्य अरुण इंगवले हे वीस मिनिटे बैठकीत सहभागी झाले. त्यांनी आयोजित कार्यक्रमाच्या पूर्वतयारीसाठी ते लवकर गेले. यावेळी सुरुवातीला जिल्ह्यातील कोरोनाची स्थिती, आटोक्यात न येणारे आकडे, होणारे मृत्यू याची सविस्तर चर्चा झाली. यावर सदस्यांनी आंदोलनाची भूमिका घेण्याचे आवाहन समरजित घाटगे यांनी केले. यावेळी शाहू पुरस्कार मिळाल्याबद्दल विजय भोजे आणि कल्पना चौगुले यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी माजी अध्यक्ष शौमिका महाडिक, राजवर्धन निंबाळकर, हेमंत कोलेकर यांच्यासह अन्य सदस्य उपस्थित होते.

चौकट

अजिंक्यतारावर कोण कोण जाते

पालकमंत्री सतेज पाटील यांच्या अजिंक्यतारा कार्यालयावर कोण कोण जाते अशी विचारणा यावेळी सदस्यांना करण्यात आल्याचे समजते. माजी आमदार हाळवणकर यांनीच हा थेट प्रश्न विचारला. त्यावेळी निधीबाबतची पत्रे आणण्यासाठी काही जण गेले असतील असे स्पष्ट करण्यात आले.

चौकट

दोन्ही काँग्रेससह शिवसेना सदस्य शुक्रवारी सहलीवर

दोन्ही काँग्रेससह शिवसेना आणि पाठिंबा दिलेले असे सर्व सदस्य शुक्रवारी सहलीवर जाण्याची शक्यता आहे. कर्नाटकात आरटीपीसीआर अहवालाशिवाय प्रवेश नसल्याने जिल्ह्यातच कुठेतरी या सर्वांना नेण्यात येणार आहे. मंत्री हसन मुश्रीफ आणि पालकमंत्री पाटील गुरुवारी जिल्ह्यात येत आहेत. त्यानंतर या निर्णयाला गती येणार आहे.

Web Title: BJP scrutinizes the background of the election of the President

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.