कोल्हापूर जिल्हा परिषदेवर भाजप-शिवसेनेचीच सत्ता

By admin | Published: March 11, 2017 11:35 PM2017-03-11T23:35:43+5:302017-03-11T23:35:43+5:30

चंद्रकांतदादा पाटील यांचा दावा : फक्त औपचारिकता बाकी, संख्याबळ गाठले ४० पर्यंत

BJP-Shiv Sena government on Kolhapur Zilla Parishad | कोल्हापूर जिल्हा परिषदेवर भाजप-शिवसेनेचीच सत्ता

कोल्हापूर जिल्हा परिषदेवर भाजप-शिवसेनेचीच सत्ता

Next

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा परिषदेवर भाजप-शिवसेना, मित्रपक्ष आघाडीची सत्ता येईल, त्याबाबत घोषणाची फक्त औपचारिकता बाकी असल्याचा दावा जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी शनिवारी केला. विविध राज्यांत भाजप सत्तेपर्यंत पोहोचल्याने त्याचा विजयोत्सव करण्यासाठी ते कोल्हापुरातील शिवाजी चौकात आले असता पत्रकारांशी बोलत होते.
कोल्हापुरातील जिल्हा परिषदेवर सत्ता कोणाची येणार? याबाबत कमालीची उत्सुकता निर्माण झाली आहे. मंगळवारी (दि. १४) अध्यक्षपदाची निवड होणार असल्याने सत्तास्थापनेसाठी भाजपसह काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसही सरसावली आहे; पण शिवसेनेची भूमिका अद्याप गुलदस्त्यात असल्याने साऱ्यांची उत्सुकता ताणली आहे.
याबाबत पालकमंत्री पाटील म्हणाले, कोल्हापूरच्या जिल्हा परिषदेवर कोणत्याही परिस्थितीत भाजप-शिवसेनेचीच सत्ता स्थापन होण्यास काहीच हरकत नाही. याबाबत वरिष्ठ आणि स्थानिक पातळ्यांवरील नेत्यांशी सविस्तर चर्चा झाली आहे. दोन्ही पक्षांची मने जुळली असल्याने जिल्हा परिषदेवर भाजप-सेनेचा झेंडा फडकण्यास काहीही अडचण नाही. सोमवारी अध्यक्ष निवडीची फक्त औपचारिकता बाकी राहिली आहे. सत्तेसाठी आवश्यक असणारा ३४ सदस्य संख्याबळाचा आकडा केव्हाच पार केला असून, तो ४० पर्यंत पोहोचला आहे. त्यामुळे सत्तास्थापनेबाबतची फक्त औपचारिकता बाकी राहिली आहे.
विरोधकांच्या सत्तेच्या दाव्याबाबत पाटील म्हणाले, कोणताही विरोधक हा सत्तेसाठी प्रयत्न करणारच; त्याप्रमाणे कोल्हापुरात विरोधी काँग्रेस-राष्ट्रवादीच्या नेत्यांचे प्रयत्न सुरू आहेत. विविध राज्यांतील निवडणूक निकालापूर्वीही विरोधकांनी उत्तर प्रदेशमध्ये काँग्रेसची सत्ता येणार, असा दावा केला होता, तसाच दावा कोल्हापुरात सुरू असल्याचे मंत्री पाटील यांनी सांगितले. (प्रतिनिधी)

Web Title: BJP-Shiv Sena government on Kolhapur Zilla Parishad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.