बावनकुळे कोल्हापुरात..भाजप कार्यकर्ते मात्र रागात; जुन्या-नव्यातील वाद वाढला
By ऑनलाइन लोकमत | Published: October 6, 2023 11:57 AM2023-10-06T11:57:53+5:302023-10-06T12:00:33+5:30
आजरा तालुक्यातून ही बंडखोरीच्या भाषेची ‘वात’ लागली आणि त्याची ‘साथ’ जिल्ह्यात पसरली
कोल्हापूर : भाजपची नवी कार्यकारिणी जाहीर झाल्यानंतर जुने कार्यकर्ते अस्वस्थ असून पक्षातूनच आपण बाहेर फेकले जाऊ अशी त्यांना भीती वाटू लागली आहे. यातूनच मग अनेक तालुक्यांमध्ये नाराजांच्या बैठका झाल्या असून पक्षाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या दौऱ्यात त्यांच्याशी चर्चा केली जाणार का, त्यांच्या नाराजीकडे कानाडोळा केला जाणार हे उद्यापर्यंत स्पष्ट होणार आहे.
निवडणुका जिंकण्यासाठी, पक्ष वाढवण्यासाठी जिल्ह्यातील अनेक नेत्यांना तुम्ही पक्षात घेता. त्याबद्दल आमची तक्रार नाही. परंतु गेली अनेक वर्षे आम्ही भाजप टिकवण्याचे, वाढवण्याचे काम केले. परंतु नव्या बदलात आमचे पालकत्व घेणारेच कोणी नाही, असा त्यांचा राग आहे.
भाजपकडून तीन आठवड्यापूर्वी कोल्हापूर महानगर, कोल्हापूर पूर्व आणि पश्चिम असे लोकसभानिहाय दोन अशा एकूण तीन जिल्हा कार्यकारिणी जाहीर करण्यात आल्या. त्यानंतर जिल्ह्यातील आजरा, गडहिंग्लज, शिरोळ, करवीर तालुक्यातील नाराजांचे मेळावे झाले. अजूनही बैठका सुरू आहेत. आजरा तालुक्यातून ही बंडखोरीच्या भाषेची ‘वात’ लागली आणि त्याची ‘साथ’ जिल्ह्यात पसरली.
पाच वर्षांपूर्वी समरजित घाटगे भाजपमध्ये आले. त्यानंतर लोकसभेच्या पराभवानंतर धनंजय महाडिक भाजपमध्ये आले. नंतर तर ते राज्यसभेचे खासदार म्हणून निवडून आले. भाजपचे जिल्ह्याचे राजकारण करताना आता चंद्रकांत पाटील, धनंजय महाडिक, समरजित घाटगे आणि सुरेश हाळवणकर हेच चर्चा करून घेत आहेत.
पुण्याचे राजकारण आणि मंत्रिपदाचा कारभार सांभाळताना चंद्रकांत पाटील यांनी कोल्हापूर जिल्ह्यातील बऱ्यापैकी अनेक जबाबदाऱ्या महाडिक आणि पाटील यांच्यावर सोपवल्या आहेत. त्यामुळे ग्रामीणच्या दोन्ही कार्यकारिणीमध्ये या दोघांना मानणाऱ्या कार्यकर्त्यांचा समावेश दिसून येतो. नाही म्हणायला कोल्हापूर महानगर जिल्हा कार्यकारिणीच्या निवडीत मंत्री पाटील यांचे वजन दिसून येते. जिल्हा नियोजन समिती असो किंवा कलाकार मानधन निवड समिती असो, नुकत्याच झालेल्या पदाधिकारी निवडी असोत किंवा कोट्यवधी रुपयांची विकासकामे करून घेण्याची प्रक्रिया असो, यातून गेली अनेक वर्षे काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना बाजूला ठेवून महाडिक, घाटगे आपल्या कार्यकर्त्यांना मोठे करत आहेत, अशी भावना या जुन्या कार्यकर्त्यांची झाली आहे.
किमान समन्वयक तरी नेमावा
जुन्या-नव्या कार्यकर्त्यांचा समन्वय राहावा, कोणत्याही निवडीमध्ये संतुलन राहावे, जुन्यांचाही सन्मान राहील असे वातावरण निर्माण करण्यासाठी किमान एखादा समन्वयक तरी नेमावा, अशी कार्यकर्त्यांची अपेक्षा आहे. खासदार धनंजय महाडिक यांनी गडहिंग्लज येथे बैठक घेऊन नाराजांचे मन वळवले आहे. आता बावनकुळे या दौऱ्यात त्यांच्याशी संपर्क साधणार का याकडे सर्वांचे लक्ष आहे.