मंत्र्यांचा ३० कोटींचा थकीत घरफाळा कधी भरून घेणार?, कोल्हापूर उत्तरच्या निवडणुकीचे पडसाद विधिमंडळात
By ऑनलाइन लोकमत | Published: March 26, 2022 11:59 AM2022-03-26T11:59:59+5:302022-03-26T12:02:03+5:30
भाजपचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांनी पालकमंत्री सतेज पाटील यांचे नाव न घेता त्यांचा ३० कोटींचा थकीत घरफाळा आयुक्त कधी भरून घेणार, अशी विचारणा विधानसभेत केली.
कोल्हापूर : कोल्हापूर उत्तरच्या निवडणुकीचे पडसाद शुक्रवारी विधिमंडळाच्या अधिवेशनामध्ये उमटले. भाजपचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांनी पालकमंत्री सतेज पाटील यांचे नाव न घेता त्यांचा ३० कोटींचा थकीत घरफाळा आयुक्त कधी भरून घेणार, अशी विचारणा विधानसभेत केली.
पाटील प्रश्न विचारताना म्हणाले, जे जे काही समाज जीवनात असले पाहिजे ते मंत्रिमंडळातील कोल्हापूरच्या मंत्र्यांकडे आहे. शाळा, कॉलेज, हॉटेल सगळे काही आहे. चांगले आहे. आनंद आहे; पण त्याचा ३० कोटींचा घरफाळा भरलेला नाही.
३१ मार्चचे उद्दिष्ट ठेवून महापालिकेचे आयुक्त ३० रुपये, ३०० रुपयांची बाकी असणाऱ्यांना रोज नोटिसा पाठवत आहेत. दंड वगैरे सगळं सुरू आहे; पण ज्यांचे ३० कोटी राहिलेत त्यांच्याबाबतीत मात्र काहीही होत नाही; परंतु या विषयामध्ये एवढ्या मोठ्या रकमेसाठी आयुक्तांनी काहीतरी कारवाई करायला हवी आणि काेल्हापूरच्या जनतेला त्याची माहिती दिली पाहिजे.
परवानगीचा प्रश्न न्यायालयात
यातील काही इमारतींना परवानगी नाही असेही आहे. याबाबतचे सर्व आक्षेप आपण न्यायालयातच घेणार आहोत, असे चंद्रकांत पाटील यांनी यावेळी सांगितले.