राज्यात भाजप, जिल्ह्यात मुश्रीफांसोबत विनय कोरे यांची स्पष्टीकरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 23, 2021 04:25 AM2021-03-23T04:25:37+5:302021-03-23T04:25:37+5:30
कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाच्या (गोकूळ) गेल्या चारवेळच्या निवडणुकीत विरोधी आघाडीच्या माध्यमातून संघर्ष केला आहे त्यामुळे ...
कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाच्या (गोकूळ) गेल्या चारवेळच्या निवडणुकीत विरोधी आघाडीच्या माध्यमातून संघर्ष केला आहे त्यामुळे आता विरोधी आघाडीत आलो याचे आश्चर्य करण्याचे कारण नसल्याचे आमदार विनय कोरे यांनी सोमवारी येथे स्पष्ट केले.
कोरे यांनी राज्याच्या राजकारणात भाजपला पाठिंबा दिला आहे आणि ते गोकुळला महाविकास आघाडीत कसे अशी विचारणा होत आहे. त्या पार्श्वभूमीवर कोरे म्हणाले, जिल्ह्याच्या राजकारणात मी ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांच्यासोबत राजकारण करत आलो आहे. गोकुळच्या निवडणुकीत सध्या जी विरोधी आघाडी आकारास आली आहे ती पूर्णाशांने महाविकास आघाडी नाही. कारण काँग्रेसचे आमदार पी. एन. पाटील हे भाजपच्या महादेवराव महाडिक यांच्यासोबत आहेत. गोकुळमध्ये मी गेल्या चार निवडणुका सातत्याने संघर्ष करत आलो. पहिल्या निवडणुकीत मीनाक्षी सोनाळकर यांच्या रूपाने यश मिळाले. गेल्या निवडणुकीत मंत्री मुश्रीफ व माजी आमदार के. पी. पाटील हे आमच्यासोबत आले असते तर तेव्हाच सत्तांतर झाले असते. कोण सोबत आले आणि कोण नाही याचा विचार न करता मागील निवडणूक पालकमंत्री सतेज पाटील यांनी ताकदीने लढवली. या निवडणुकीत सत्तारूढ आघाडीतील प्रमुख संचालक आमच्यासोबत आले आहेत, कारण त्यांना आमची भूमिका पटली. त्यामुळे या लढाईचा मार्गही सुकर झाला आहे.