महिला अत्याचाराच्या निषेधार्थ भाजप रस्त्यावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 13, 2020 11:22 AM2020-10-13T11:22:06+5:302020-10-13T11:23:29+5:30
bjp, kolhapur, morcha शिवसेना-कॉंग्रेस -राष्ट्रवादी महाविकास आघाडी सरकार राज्यातील महिलांचे रक्षण करण्यात पूर्णपणे अपयशी ठरले आहे. याच्या निषेधार्थ सोमवारी भाजप जिल्हाध्यक्ष राहुल चिकोडे, महिला मोर्चा अध्यक्षा गायत्री राऊत यांच्या नेतृत्वाखाली माळकर तिकटी याठिकाणी रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. यावेळी पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेतले.
कोल्हापूर : शिवसेना-कॉंग्रेस -राष्ट्रवादी महाविकास आघाडी सरकार राज्यातील महिलांचे रक्षण करण्यात पूर्णपणे अपयशी ठरले आहे. याच्या निषेधार्थ सोमवारी भाजप जिल्हाध्यक्ष राहुल चिकोडे, महिला मोर्चा अध्यक्षा गायत्री राऊत यांच्या नेतृत्वाखाली माळकर तिकटी याठिकाणी रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. यावेळी पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेतले.
भाजप पदाधिकारी, नगरसेवक, कार्यकर्ते यांनी चारही बाजूंनी चौक अडवून महाविकास आघाडी सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. महिलांना सुरक्षितता देण्यास असमर्थ ठरलेल्या महाविकास आघाडी सरकारचा धिक्कार असो, महिलांवर वाढले अत्याचार...अजूनही निद्रस्त महाआघाडी सरकार अशा घोषणा यावेळी देण्यात आल्या.
गायत्री राऊत म्हणाल्या, महाविकास आघाडी सरकारच्या काळात अवघ्या महाराष्ट्रात महिला सुरक्षेचा प्रश्न अतिशय गंभीर होत चालला आहे. त्यातच कोरोना महामारीसारख्या गंभीर काळातदेखील कोविड सेंटर व हॉस्पिटल्समध्ये महिलांवरील अत्याचार, विनयभंगाचे सत्र सुरूच आहे. यावेळी नगरसेविका उमा इंगळे, प्रमोदिनी हार्डीकर, विद्या बनछोडे, संगीता खाडे यांनी मनोगत व्यक्त केले.
यावेळी संघटन सरचिटणीस अशोक देसाई, सरचिटणीस विजय जाधव, दिलीप मेत्राणी, हेमंत आराध्ये, उपाध्यक्ष मारुती भागोजी, संतोष भिवटे, संजय सावंत, राजू मोरे, अमोल पालोजी, विजय आगरवाल, सचिन तोडकर, भारती जोशी, जिल्हा चिटणीस प्रदीप उलपे, सुनीलसिंह चव्हाण, दिग्विजय कालेकर, भाजपा गटनेते अजित ठाणेकर, को.म.न.पा विरोधी पक्षनेते विजय सूर्यवंशी, नगरसेवक विजयसिंह खाडे-पाटील यांच्यासह पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.