शारीरिक, राजकीय वजनाची गल्लत म्हणजे बुद्धीची कीव, भाजपचा टोला : मागच्या दोन महिन्यांत लसीकरणात कोल्हापूर मागेच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 2, 2021 04:16 AM2021-07-02T04:16:36+5:302021-07-02T04:16:36+5:30
कोल्हापूर : भाजपने कोल्हापूर शहरातील लसीकरणाची वस्तुस्थिती मांडल्यावर काँग्रेस-राष्ट्रवादीने नेहमीच्या सवयीने मूळ मुद्दा बाजूला सोडून राष्ट्रीय मुद्दे उपस्थित करण्याचा ...
कोल्हापूर : भाजपने कोल्हापूर शहरातील लसीकरणाची वस्तुस्थिती मांडल्यावर काँग्रेस-राष्ट्रवादीने नेहमीच्या सवयीने मूळ मुद्दा बाजूला सोडून राष्ट्रीय मुद्दे उपस्थित करण्याचा केविलवाणा प्रयत्न केला आहे. त्यांच्या या प्रयत्नातून महाभकास आघाडी सरकारने कोल्हापूरवर केलेला अन्याय अप्रत्यक्षपणे मान्य केल्याचे सिद्ध होत आहे. राजकीय व शारीरिक वजन ज्यांना सारखेच वाटते त्यांच्या बुद्धीची कीव करावी वाटते, असा टोला भाजपच्या कार्यकर्त्यांनी गुरुवारी लगावला.
भाजप प्रदेश कार्यकारणी सदस्य महेश जाधव, जिल्हाध्यक्ष राहुल चिकोडे, अशोक देसाई, विजय जाधव, दिलीप मेत्राणी, हेमंत आराध्ये, गणेश देसाई व अजित ठाणेकर यांनी लसीकरणावरून सुरू असलेल्या टीकेवरून दोन्ही काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना प्रत्युत्तर देणारे पत्रक प्रसिद्धीस दिले आहे.
त्यात म्हटले आहे, लसीकरणाच्या विषयावर गंभीरपणे उत्तर देण्याऐवजी, पायावर पाय देण्याच्या भाषा म्हणजे उर्मटपणाच म्हणायला हवा. श्रावणबाळाची कावड वाहना-यांनी जरा मराठी वाड.मयाचाही नीट अभ्यास करावा आणि मगच पायावर पाय देण्याची भाषा करावी. आरोग्य राज्यमंत्री आजवर जिल्ह्यात झालेल्या लसीकरणामुळे जिल्हा राज्यात लसीकरण प्रथम क्रमांकावर असल्याचे सांगत असले तरी, प्रत्यक्षात हे लसीकरण एप्रिल व मे महिन्यात झालेले आहे. त्यामुळेच कोल्हापूरचे लसीकरणाची टक्केवारी वाढल्यासारखी वाटते, परंतु प्रत्यक्षात अन्य शहरातील लसीकरणाची संख्या पाहता मे व जून महिन्यात कोल्हापूर जिल्ह्याला लसीचा अत्यल्प पुरवठा झाल्याचे स्पष्ट आहे. त्यामुळे अन्य काही जिल्ह्यात व शहरात सुरू असलेले १८ वर्षांवरील सर्व नागरिकांचे लसीकरण कोल्हापूर जिल्ह्यामध्ये बंद ठेवावे लागले आहे. २१ जूनला राज्यात ३ लाथ ८१ हजार लसीकरण झाले असताना त्या दिवशी कोल्हापूर जिल्ह्यात फक्त ३१८४ लसी दिल्या गेल्या. ही संख्या राज्यातील लसीकरणाच्या १ टक्काही नाही. २३ जूनला महाराष्ट्रातील विक्रमी ६,०२,००० लसीकरणामध्ये कोल्हापूर शहरात केवळ ४९८ लोकांचे लसीकरण झाले होते. त्यामुळे लसीकरणाबाबत राज्य सरकार कोल्हापूरवर अन्याय करत आहे हेच खरे.