समरजीतसिंह घाटगेंना थांबवण्यासाठी भाजपच्या हालचाली; पक्षाने दिली 'ही' मोठी ऑफर?

By ऑनलाइन लोकमत | Published: August 21, 2024 03:57 PM2024-08-21T15:57:52+5:302024-08-21T16:08:50+5:30

Samarjit Singh Ghatge: समरजीतसिंह घाटगे यांना पक्षात थांबवण्यासाठी भाजपकडून हालचाली सुरू आहेत.

BJP tries to stop Samarjit Singh Ghatge The party gave this big offer to him | समरजीतसिंह घाटगेंना थांबवण्यासाठी भाजपच्या हालचाली; पक्षाने दिली 'ही' मोठी ऑफर?

समरजीतसिंह घाटगेंना थांबवण्यासाठी भाजपच्या हालचाली; पक्षाने दिली 'ही' मोठी ऑफर?

Kagal Assembly ( Marathi News ) : कोल्हापुरातील भाजप नेते समरजीतसिंह घाटगे हे लवकरच राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश करण्याची शक्यता आहे. पक्षप्रवेशाबाबत चर्चा करण्यासाठी घाटगे यांनी काल राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांचीही भेट घेतल्याची माहिती आहे. घाटगे यांच्या पक्षांतराने कोल्हापूर जिल्ह्यात भाजपला मोठा धक्का बसणार आहे. या पार्श्वभूमीवर त्यांना पक्षात थांबवण्यासाठी भाजपकडून हालचाली सुरू असून भाजप नेतृत्वाकडून समरजीतसिंह घाटगेंना विधानपरिषदेची ऑफर दिली जाणार असल्याचे समजते.

भाजप नेते आणि राज्यसभा खासदार धनंजय महाडिक हे आज समरजीतसिंह घाटगे यांची भेट घेऊन चर्चा करणार आहेत. या भेटीत महाडिक हे भाजप नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा निरोप घाटगेंपर्यंत पोहोचवणार आहेत. याबाबत स्वत: धनंजय महाडिक यांनी माहिती दिली आहे. "समरजीतसिंह घाटगे यांच्या राजकीय निर्णयाबाबत मी आज वृत्तपत्रांमध्ये बातमी वाचली. त्यानंतर माझी त्यांच्यासोबत फोनवर चर्चा झाली आहे. तसंच मी देवेंद्र फडणवीस यांच्यासोबतही बोललो आहे. आमची जी काही चर्चा झाली ती मी आज सायंकाळी भेटून समरजीत यांच्या कानावर घालणार आहे. जिल्ह्यातील भाजपचा एक कार्यकर्ता म्हणून मी समरजीतसिंह घाटगे यांना भाजपमध्ये थांबण्याची विनंती करणार आहे," अशी माहिती महाडिक यांनी दिली.

दरम्यान, भाजपकडून विधानपरिषदेची ऑफर देण्यात येणार असली तरी विधानपरिषदेवर कधी संधी मिळणार, याबाबत अनिश्चितता आहे. त्यामुळेच समरजीतसिंह घाटगे हे आपला निर्णय बदलण्याची शक्यता कमी आहे.

कागलमध्ये कसं आहे राजकीय चित्र?

विधानसभेच्या मागील निवडणुकीत 'कागल'मध्ये तिरंगी लढत झाली होती. राष्ट्रवादीकडून हसन मुश्रीफ, शिवसेनेकडून संजय घाटगे तर अपक्ष म्हणून समरजित घाटगे रिंगणात उतरले होते. यावेळी समरजीत घाटगे यांनी ८८ हजार मते घेतली होती. तेव्हापासून त्यांनी भाजपच्या माध्यमातून पाच वर्षे तयारी केली आहे, मध्यंतरी राज्यातील नवीन समीकरणामुळे त्यांची कोंडी झाली. महायुतीमध्ये ही जागा राष्ट्रवादीकडून हसन मुश्रीफ यांना जाणार आहे. त्यात महाविकास आघाडीचे संभाव्य उमेदवार संजय घाटगे यांनी निवडणुकीतून माघार घेऊन पालकमंत्री मुश्रीफ यांना पाठिंबा दिल्याने 'कागल'चे राजकारण वेगळ्या वळणावर आले. समरजीत घाटगे यांनी संपर्क मोहीम राबवली असली तरी ते कोणत्या पक्षातून लढणार याविषयी उत्सुकता होती. आघाडीमध्ये 'कागल'ची जागा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडे जाणार असल्याने त्यांनी ज्येष्ठ नेते शरद पवार यांची भेट घेतली.
 

Web Title: BJP tries to stop Samarjit Singh Ghatge The party gave this big offer to him

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.