भाजपकडून कोल्हापूर लोकसभेच्या दोन्हीही जागेवर लक्ष - केंद्रीय विधि व न्यायमंत्री बघेल
By ऑनलाइन लोकमत | Published: August 23, 2022 03:57 PM2022-08-23T15:57:17+5:302022-08-23T15:57:49+5:30
भाजपाकडून लोकसभा निवडणुकीची दीड वर्षे अगोदरच तयारी सुरू
कोल्हापूर : लोकसभा निवडणुकीसाठी अद्याप दीड वर्षांचा कालावधी असला तरीही भाजपकडून देशातील १४४ मतदार संघांवर विशेष लक्ष केंद्रीत केले आहे. त्यामध्ये कोल्हापूर जिल्ह्यातील दोन्हीही जागांचा समावेश असल्याचे मत केंद्रीय विधि व न्याय राज्यमंत्री सत्यपालसिंह बघेल यांनी व्यक्त केले.
भाजपाकडूनलोकसभा निवडणुकीची दीड वर्षे अगोदरच तयारी सुरू केली आहे. लोकसभा प्रवास योजनेंतंर्गत मंत्री बघेल हे तीन दिवसांच्या कोल्हापूर दौऱ्यावर आले आहेत. त्यांच्याकडे कोल्हापूरसह तीन जिल्ह्यांची जबाबदारी देण्यात आली आहे. त्या पार्श्वभूमीवर ते कोल्हापुरात पत्रकारांशी बोलत होते.
भविष्यात कोल्हापूर जिल्ह्यातील दोन्हीही खासदार हे भाजपचे असतील का? यावर मंत्री बघेल म्हणाले, राजकारणात कोणत्याही शक्यतेचा इन्कार नाकारता येत नाहीत. युती कोणासोबत करायची हे वेळ आल्यावरच ठरविले जाते. आमचा राष्ट्रीय पक्ष आहे, संघटना मजबूत करण्याचे आमचे काम आहे. मित्र कोण आणि शत्रू कोण हे वरिष्ठच ठरवतील, असेही ते म्हणाले.
शिवसेना बंडखोर मतदार संघावर भाजपचे लक्ष
भाजपकडून लोकसभेच्या ज्या मतदार संघावर लक्ष केंद्रीत केले आहे, त्यात राज्यातील सर्वाधिक मतदार संघ बंडखोर शिवसेना खासदारांचे आहेत पण याबाबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यापूर्वीच शिंदे गट आणि भाजप एकत्रित लढणार असल्याचे सांगितले आहे, त्यानुसार पुढील रणनीती ठरविली जाईल, असेही मंत्री बघेल यांनी स्पष्ट केले.