विनासत्ता भाजपचा जिल्ह्यात लागणार कस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 25, 2020 04:19 AM2020-12-25T04:19:09+5:302020-12-25T04:19:09+5:30

कोल्हापूर : एकीकडे जिल्ह्यातील ४३३ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे आणि दुसरीकडे कोल्हापूर महापालिकेसाठीच्या नियोजनाला सुरुवात झाली आहे. ...

BJP will have to work hard in the district | विनासत्ता भाजपचा जिल्ह्यात लागणार कस

विनासत्ता भाजपचा जिल्ह्यात लागणार कस

googlenewsNext

कोल्हापूर : एकीकडे जिल्ह्यातील ४३३ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे आणि दुसरीकडे कोल्हापूर महापालिकेसाठीच्या नियोजनाला सुरुवात झाली आहे. राज्यातील सत्ता नसताना आणि दोन्ही काँग्रेससह शिवसेना सत्तेत एकत्र असताना भाजपचा जिल्ह्यात कस लागणार आहे. त्यामुळे सत्ता असताना वाढलेली भाजप सूज होती की मुळातच भाजपचे पाठबळ वाढले आहे हे देखील या निमित्ताने स्पष्ट होणार आहे. कोल्हापूर महापालिकेच्या गेल्या निवडणुकीमध्ये भाजपने १४ नगरसेवक निवडून आणले होते. तर महाडिक यांच्या ताराराणी आघाडीने त्यांच्यापेक्षा जास्त म्हणजे १९ नगरसेवक निवडून आणले होते. त्यावेळी भाजप-शिवसेना राज्यात सत्तेत एकत्र असूनही अखेरपर्यंत राजेश क्षीरसागर भाजपच्या हाताला लागले नाहीत. आतातर भाजप एकाकी पडला आहे. त्यामुळे शहरात भाजपचा कस लागणार आहे. ताराराणी आघाडीची सोबत आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कारभारावर भरोसा ठेवूनच भाजपला आपली व्यूहरचना करावी लागणार आहे.

जिल्ह्यातील ४३३ ग्रामपंचायतींच्या निवडणुका जाहीर झाल्या आहेत. पाच वर्षे भाजपची सत्ता असताना प्रत्येक तालुक्यात जोडण्या घालत चंद्रकांत पाटील यांनी अनेक जणांना पक्षात आणले; परंतु राज्यातील सत्ता गेल्याने आता ही मंडळी बॅकफूटवर आल्याचे चित्र आहेत. ग्रामीण जिल्हाध्यक्ष समरजित घाटगे यांनी रोज काही ना काही दौरा, कार्यक्रम सुरूच ठेवला आहे. या निवडणुकांमध्ये घाटगे यांच्यासह भाजपच्या तालुकास्तरीय नेत्यांनाही अधिक कार्यप्रवण व्हावे लागणार आहे.

ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ आणि पालकमंत्री सतेज पाटील यांनीदेखील या निवडणुकांमध्ये लक्ष घातले आहे. दोन्ही काँग्रेसच्या तालुकास्तरीय नेत्यांनाही त्यांच्या पुढच्या वाटचालीची काळजी असल्याने त्यांनीही जोडण्या घातल्या आहेत. आगामी पंचायत समिती, जिल्हा परिषद निवडणुकांसाठी ग्रामपंचायतीची सत्ता महत्त्वाची असल्याने त्यादृष्टीनेही नेतेमंडळी सक्रिय झाली आहेत. सत्ता नसताना चांगले यश मिळविले. आता तीन पक्षांनी एकत्र येऊन भाजपच्या हाताला काही लागू न देण्याची मोर्चेबांधणी त्यांनी केली आहे. अशा परिस्थितीमध्ये आता भाजपला आपले नियोजन करावे लागणार आहे. निवडणुकीनंतर गरज पडलीच तर शिवसेनेचे सदस्य दोन्ही काँग्रेसबरोबर जातील. भाजपला एकाकी पाडले जाणार आहे. त्यामुळे भाजपची खऱ्या अर्थाने सत्त्वपरीक्षा आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राष्ट्रवादीच्या नेते कार्यकर्त्यांना शिवसेनेशी जुळवून घेण्याच्या सूचना दिल्याने आता तशा हालचाली सुरू झाल्या आहेत. प्रदेशाध्यक्ष पाटील यांनी पदाधिकाऱ्यांची बैठक लावून तुम्ही लढा, मी पाठीशी आहे असा संदेश दिला आहे. त्यामुळे पदाधिकारीही नेटाने कामाला लागण्याची चिन्हे आहेत.

चौकट

भाजपमध्ये नव्या-जुन्यांचा संघर्ष

भाजपमध्ये नव्या-जुन्यांचा संघर्ष गेली सहा वर्षे सुरू आहे. मात्र, सत्ता गेल्यानंतर भाजपमधील काहीजणांचे धाडस वाढल्याचे स्पष्ट झाले आहे. त्याचमुळे थेट प्रदेशाध्यक्ष यांच्या जिल्ह्यातील कार्यकर्त्यांनीच त्यांचा व जिल्हाध्यक्षांचा राजीनामा मागण्याचे धाडस केले. त्यांची संभावना फुटकळ कार्यकर्ते अशी केली असली तरी त्या मागणीची दखल प्रदेश पातळीवरही घेतली गेली आहे. प्रत्येक तालुक्यात असा नव्या-जुन्यांचा संघर्ष सुरू आहे. त्यांच्यामध्ये समन्वय ठेवण्यामध्येही नेतेमंडळी कमी पडत असल्याचे चित्र आहे.

चौकट

महाडिकांना किती वाव?

कोल्हापूर महापालिकेमध्ये धनंजय महाडिक यांच्याकडे निवडणुकीची सूत्रे द्यावीत असे भाजपमधील काहीजणांचे म्हणणे आहे. मात्र, प्रदेशाध्यक्षांच्याजवळ असणारे पदाधिकारी आणि महाडिक गटाचे सूर अजूनही म्हणावे तसे जुळलेले नाहीत. हे सूर लवकर जुळले आणि एकजिनसीपणाने पक्ष निवडणुकीला सामोरा गेला तरच चांगली संख्या गाठू शकेल.

Web Title: BJP will have to work hard in the district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.