मुख्यमंत्र्यांना राख्या पाठविण्याचा भाजपचा फंडा, पूरग्रस्तांच्या जखमेवर मीठ
By ऑनलाइन लोकमत | Published: August 13, 2019 04:58 AM2019-08-13T04:58:06+5:302019-08-13T04:58:47+5:30
गेल्या सहा दिवसांपासून पुराचा सामना करत असलेल्या कोल्हापुरातील महिलांना भाजपच्या वतीने मुख्यमंत्र्यांच्या नावे राखी विकत घेऊन पाठविण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
कोल्हापूर : गेल्या सहा दिवसांपासून पुराचा सामना करत असलेल्या कोल्हापुरातील महिलांना भाजपच्या वतीने मुख्यमंत्र्यांच्या नावे राखी विकत घेऊन पाठविण्याचे आवाहन करण्यात आले आहे. एकीकडे पुरात घरादाराची वाताहत झालेल्या निवाऱ्यासह मूलभूत वस्तूंची दैना असताना घरोघरी आलेल्या या पाकिटांबद्दल तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली आहे. भाजपकडून पूरग्रस्तांच्या जखमेवर मीठ चोळण्याचाच हा प्रकार असल्याची टीका त्यामुळे होत आहे.
जुलैत भाजपच्या वतीने रक्षाबंधनानिमित्त ‘सुवर्णबंध महोत्सव’ सुरू करण्यात आला. याअंतर्गत भाजप सरकार सत्तेत आल्यापासून विविध योजनांचा लाभ मिळालेल्या महिलांच्या वतीने मुख्यमंत्र्यांना राज्यातून २१ लाख राख्या पाठविण्याचा निर्णय घेतला होता.
प्रत्येक मतदारसंघातील लाभार्थी महिलेकडून मुख्यमंत्र्यांसाठी एक राखी पाठविण्यासाठी भाजपच्याच वतीने मुख्यमंत्र्यांच्या सहीनिशी असलेले पत्र योजनांचे माहितीपत्रक आणि पाकिटे सगळीकडे पाठविण्यात आली आहेत. त्यातील कांही
पाकिटे सोमवारी शाहूनगर वड्डवाडी येथील महिलांना मिळाली आणि पूरग्रस्तांमधून तीव्र नाराजी व्यक्त होऊ लागली.
जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांची सेल्फी, आमदार सुरेश हाळवणकर यांनी सरकारी मदत धान्यांवर छायाचित्रे झळकविल्याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कमालीचे नाराज झाले होते. राख्या पाठविण्याचा कार्यक्रम अगोदर जाहीर झाला असला तरी सध्या महापुराच्या संकटाने लोक त्रस्त असताना तो स्थगित करायला हवा होता. भाजपला लोकांच्या सुखदु:खापेक्षा पक्षाची जाहिरातबाजी जास्त महत्वाची वाटते की काय, अशी भावना व्यक्त होत आहे.