संप मिटेपर्यंत भाजपा संपकरी कर्मचाऱ्यांना शिधा पुरवणार - चंद्रकांत पाटील
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 16, 2022 07:31 PM2022-01-16T19:31:26+5:302022-01-16T19:31:53+5:30
भारतीय जनता पक्षातर्फे धान्य किट वाटप
कोल्हापूर : एस.टी.कर्मचाऱ्यांचा संप मिटेपर्यंत कोल्हापूर विभागातील अडीच हजार कर्मचाऱ्यांची चुल पेटविण्याची जबाबदारी भारतीय जनता पक्ष घेत आहे. अशी घोषणा भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी रविवारी कोल्हापूरात केली. त्यांच्या हस्ते मध्यवर्ती बसस्थानकासमोर आंदोलनस्थळी संपात सहभागी झालेल्या कर्मचाऱ्यांना धान्य किट वाटप करण्यात आले. त्या प्रसंगी ते बोलत होते.
भाजपा प्रदेशाध्यक्ष पाटील म्हणाले, हा संप लवकर मिटावा आणि स्वाभीमानाने कर्मचाऱ्यांनी कामावर जावी अशी अपेक्षा व्यक्त केली.
राज्यात महाविकास आघाडीचे सत्ता आल्यापासून हैदोस सुरु आहे. यांचे काही तरी नक्की होणार . अंबाबाई जागी होईल आणि काहीतरी चांगले करेल. असे साकडे त्यांनी देवीला यानिमित्त घातले. शिधा वाटप झाल्यामुळे कर्मचाऱ्यांच्या डोळ्यात आश्रू होते. तर काहींनी सरकार आमच्या रक्ताने थंड होणार असेल तर आम्ही रक्त सांडण्यास तयार आहोते. अशी भावना व्यक्त केली. त्यावर पाटील यांनी असे आत्महत्या किंवा हिंसेने हा प्रश्न सुटणार नाही. अशी समजूत काढली. राज्य सरकारची ताठार भूमिका जास्त काळ चालणार नाही. आंदोलन लवकरच संपुष्टात येईल. अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. महामंडळच्या जमीनीवर काहींचा डोळा आहे. त्यामुळे मोडीत काढण्याचा त्यांचा डाव आहे. असा आरोपही त्यांनी केला.
संपकरी कर्मचाऱ्यांच्या आत्महत्या, शेतकरी आत्महत्या आणि काल एमपीएससी करणाऱ्या विद्यार्थ्यानेही आत्महत्या केली. याची सर्व जबाबदारी म्हणून या मारेकरी सरकारवर खुनाचा गुन्हा दाखल झाला पाहीजे. अशी मागणी त्यांनी केली. त्यांच्या हस्ते संपात सहभागी झालेल्या कर्मचाऱ्यांना एक किलो शेगतेल, चटणी, वाटाणा, साखर, हरभरा आदी धान्याचे किट वाटप करण्यात आले. यावेळी पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे माजी अध्यक्ष महेश जाधव, भाजप जिल्हाध्यक्ष राहुल चिकोडे, विजय जाधव, गणेश देसाई, कर्मचारी संघटनेचे उत्तम पाटील, निशांत घाटगे, संजय घाटगे आदी उपस्थित होते. राज्यातही हा उपक्रम राबविण्याची सुचना राज्यातील प्रत्येक आगारामध्ये अशा प्रकारे भारतीय जनता पक्षाचे जिल्हाध्यक्षांनी धान्य किट वाटप करावे. जेणेकरून तेथील कर्मचाऱ्यांची चुल पेटेल. याची दक्षता घ्यावी अशा सुचना जिल्हावार अध्यक्षा देण्यात येईल. असेही पाटील यांनी स्पष्ट केले.